वैयक्तीक व्याज परतावा योजनेने व्यवसाय, उत्पन्न वाढले

Ø पाच होतकरू युवकांना मिळाला रोजगार ; Ø कर्जावर 12 टक्के दराने मिळाली सवलत
मराठा समाज व ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही, अशा प्रवर्गाकरीता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविली जाते. दिग्रस येथील एका होतकरू युवकाने या योजनेच्या माध्यमातून आपल्या व्यवसायात वाढ तर केलीच शिवाय पाच युवकांना त्याने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने मराठा समाज व ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही, अशा प्रवर्गातीस उमेदवारांना हक्काचा उद्योग, व्यवसाय, स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यातील वैयक्तिक कर्ज व्याज परतावा ही अत्यंत महत्वाची योजना ठरली आहे. महामंडळाच्या या योजनेतून उद्योग, व्यवसायासाठी कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड केल्यास महामंडळ अशा लाभार्थ्यांस घेतलेल्या कर्जावर दरसाल दरशेकडा 12 टक्के दराने व्याजाचा परतावा करते. दिग्रस येथील सौरव मारोतराव मोरे यांचे शहरात मोबाईल शॅाप होते. त्यांना आपल्या या शॅापला शोरुमध्ये रुपांतरीत करून व्यवसाय वाढविण्यासाठी निधीची आवश्यकता होती. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने त्यांना वैयक्तिक कर्ज योजनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून योजनेसाठी अर्ज सादर केला होता. महामंडळाच्या अटी, शर्तीची पुर्तता केल्यानंतर त्यांचे प्रकरण मंजूर करून कर्जासाठी दिग्रस येथीलच बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत पाठविण्यात आले होते. बॅंकेच्यावतीने कर्ज मंजूरीसाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून घेतल्यानंतर त्यांना योजनेंतर्गत कर्ज मंजूर करण्यात आले. चार लाख रुपये बॅंकेने तत्काळ उपलब्ध करून दिले. सुरुवातीस मोबाईल विकले जात होते. या कर्जातून त्यांनी आपल्या व्यवसायाची वाढ केली. त्यामुळे त्यांच्या व्यवसायात दुप्पटीने वाढ झाली आहे. घेतलेल्या कर्जावर त्यांना महामंडळाच्या नियमाप्रमाणे दरसाल दरशेकडा 12 टक्के दराने व्याज परताव्याचा लाभ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या व्यवसायात पाच होतकरू आणि गरजू युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमुळे मला माझ्या व्यवसायात वाढ करता आली असल्याचे सौरभ सांगतो. ही योजना अत्यंत चांगली असून प्रवर्गातील इतरही युवकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे. होतकरु युवक महामंडळाच्या उद्योग भवन येथील कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी