जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते १० लाखाच्या विमा रक्कमेचे वितरण

केवळ ३९६ रुपयात विमा संरक्षण ; कुटुंबियास मिळाले १० लाख रुपये ; इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा उपक्रम ; केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी वित्तीय समावेशन योजनेंतर्गत भारतीय डाक विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्यावतीने अपघात विमा योजना सुरु करण्यात आली आहे. केवळ ३९६ रुपयात १० लाखाचे सुरक्षा कवच योजनेने दिले आहे. या योजनेंतर्गत विमा घेतलेल्या आणि अपघाती निधन झालेल्या यवतमाळ तालुक्यातील बेलोरा येथील चक्रधर मानकर यांच्या कुटुंबियास जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याहस्ते १० लाखाचा धनादेश देण्यात आला.
बजाज अलियांझ आणि टाटा एआयजीच्या सहकार्याने एक वर्षापूर्वी अपघात विमा योजना सुरु करण्यात आली. शहरी आणि ग्रामीण भागात विशेषतः असंघटीत क्षेत्रातील कामगार, शेतकरी, मजूर मोठ्या संख्येने योजनेत सहभाग घेत आहे. हा अपघात विमा अवघ्या ३९६ रुपयामध्ये सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये विमाधारकाचा अपघातामुळे मृत्यू, पूर्ण अपंगत्व, अर्धांगवायू झाल्यास १० लाखापर्यंत क्लेम बहाल केला जातो. किरकोळ अपघातात दुखापत किंवा फ्रॅक्चर इत्यादी घटना घडल्यास ओपीडी तसेच आयपीडी उपचारासाठी देखील खर्च मिळतो. तसेच विमाधारकाच्या नातलगांना प्रवास खर्च, मुलांचा शिक्षण खर्च आणि मृत्यू पश्चात अंतिम संस्कारसाठी लागणारा खर्च देण्यात येतो. यवतमाळ तालुक्यातील बेलोरा येथील चक्रधर मानकर यांनी मागीलवर्षी हा विमा घेतलेला होता. विमा घेतल्यानंतर चालू वर्षात त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबातील वारसाला या अपघात विम्याचा १० लाखाचा क्लेम मंजूर करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याहस्ते १० लाखाचा धनादेश श्री.मानकर यांची मुलगी दीक्षा मानकर यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, रिजर्व बँकेचे अग्रणी बँक प्रबंधक राजकुमार जयस्वाल, जिल्हा अग्रणी प्रबंधक अमर गजभिये, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या यवतमाळ शाखेचे वरिष्ठ प्रबंधक चीत्रसेन बोदिले, प्रबंधक अमोल रंगारी, एक्झिक्युटिव्ह गजानन मालेकर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी