शासन आपल्या दारी : 75 हजार लाभार्थ्यांना मिळाला लाभ

जिल्ह्यात 160 गावांमध्ये शिबिरांचे आयोजन ; महसूल, कृषि, आरोग्यसह विविध योजनांचा लाभ ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार भव्य मेळावा :
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सर्वसामान्य गरीब, गरजू, कष्टकरी, कामगार, शेतकरी, महिला, बालके, दिव्यांग, वयोवृध्द अशा समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजना संबंधितांना कालमर्यादेत आणि पारदर्शकपणे उपलब्ध होण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यासाठीच राज्यभर ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात 75 हजार 810 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. राज्यातील गरीब, सर्वसामान्य जनतेपर्यंत कालमर्यादेत योजना पोहोचविण्याच्या उद्देशाने 15 एप्रिल पासून सर्व जिल्ह्यांमध्ये ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 160 गावांमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून 75 हजार 810 लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देण्यात आला. अभियानांतर्गत जिल्ह्यात घेण्यात आलेल्या शिबिरांमध्ये यवतमाळ तालुक्यात विविध ठिकाणी पार पडलेल्या शिबिरात 5 हजार 467 लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. बाभूळगाव तालुक्यातील 1 हजार 691 लाभार्थ्यांना लाभ मिळाला. आर्णी तालुका 4 हजार 102 लाभार्थी, कळंब तालुका 7 हजार 24 लाभार्थी, राळेगाव तालुका 4 हजार 29 लाभार्थी, नेर तालुका 2 हजार 846 लाभार्थी, दारव्हा तालुका 6 हजार 238, दिग्रस तालुका 10 हजार 285, पुसद तालुका 10 हजार 1, उमरखेड तालुका 3 हजार 423, महागाव तालुका 4 हजार 182, घाटंजी तालुका 7 हजार 901, केळापूर तालुका 1 हजार 32, झरी तालुका 656, वणी तालुका 4 हजार 117, मारेगाव तालुका 1 हजार 339 तर पाढंरकवडा तालुक्यातील 877 अशा एकूण 75 हजार 810 लाभार्थ्यांचा समावेश आहे.
शासन आपल्या दारी या अभियानात सर्वच विभागांनी सहभागी होऊन आपल्या योजनांचा लाभ देण्याचे शासनाचे निर्देश आहे. त्यामुळे महसूल, आरोग्य विभाग, कृषी, एकात्मिक बाल विकास, सहकार, भूमि अभिलेख, पशुवैद्यकीय आदी विभागांसह जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेले विविध विभाग व विविध महामंडळांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना दिला जात आहे. यामध्ये शिधापत्रिका, वय, राष्ट्रीयत्व, अधिवास, उत्पन्न, जात, नॉन क्रिमीलेअर दाखला, मतदार, आधार नोंदणी व दुरुस्ती, संजय गांधी योजना, सलोखा, कर्जमुक्ती योजना, जनआरोग्य, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, मातृवंदना व कुटुंब कल्याण योजना, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, कुपोषित बालकांची तपासणी, जमीन मोजणी, भूमापन, प्रॉपर्टी कार्ड, कृषी अवजारे, बियाणे, औषध वाटप, महाडीबीटी नोंदणी, किसान क्रेडिट कार्ड, पशुसंवर्धन प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रमाई घरकुल, सुकन्या समृद्धी योजना, आधार जोडणी आदी सरकारी योजनांचा समावेश आहे जिल्ह्यात अभियानांतर्गत रोजगार, रक्तदानासारखे वेगवेगळी शिबिरे, पासपोर्ट, कृषी सेवा केंद्राचे परवाने, सेवानिवृत्ती लाभ, आधारकार्ड, पॅनकार्ड सुविधा, पीएम किसान योजना, विवाह नोंदणी, ई-श्रम कार्ड, भरती मेळावा, पीएम घरकुल योजना, मनरेगा जॉबकार्ड, डिजिटल इंडिया, सखी किट वाटप, शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ, मुलींना सायकल वाटप, नवीन मतदार नोंदणी, दिव्यांग साहित्य व शिधापत्रिका वाटप, शिकाऊ चालक परवाना, कृषी प्रदर्शन असे विविध कार्यक्रम होत आहेत. अभियान 30 ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार होते. अभियानाला लाभत असलेला प्रतिसाद पाहता अभियान कालावधी 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आला आहे. जिल्हास्तरीय होणार भव्य मेळावा जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजित शिबिरांमध्ये लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सरपंच यांच्या सहकार्याने अभियान यशस्वी होत आहे. या अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित केला जाणार आहे. या एकाच कार्यक्रमात हजारो लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन प्रशासन करत आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी