पालकमंत्र्यांनी घेतला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा

वैद्यकीय महाविद्यालयात ऑनलाईन सुविधा सुरु करा - पालकमंत्री संजय राठोड > वाढीव सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यास मान्यता > १०० वाढीव सुरक्षा रक्षकांच्या प्रस्तावाला मान्यता > अनधिकृत फेरीवाल्याविरुद्ध कारवाई करा > रुग्ण नोंदणी, तक्रारींसाठी ॲानलाईन सुविधा सुरु करा > तक्रार निवारण कक्ष २४ तास सुरु ठेवा > शासनस्तरावरील विषयी मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेणार : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयात पायाभूत सुविधांची कामे महिन्याभरात करावीत. रुग्ण नोंदणी, शस्त्रक्रियांची माहिती आणि तक्रारींसाठी ॲानलाईन सुविधा सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री संजय राठोड यांनी रुग्णालय व महाविद्यालयातील विविध सुविधांचा आढावा घेतला. यात प्रामुख्याने परिसरातील सीसीटिव्ही, सुरक्षा रक्षक, स्वच्छता, तक्रार कक्ष, रिक्त पदे, अनधिकृत फेरीवाल्यांबाबतच्या तक्रारी, वैद्यकीय उपकरणे, विविध चाचणी कक्ष, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी आमदार मदन येरावार, पोलिस अधीक्षक डॅा. पवन बन्सोड, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अधिष्ठाता डॉ.गिरिष जतकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.वाडकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. रुग्णालयातील सुविधा, रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात येणारी वागणूक, स्वच्छतेबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शिस्त गरजेची आहे. पण अपमानास्पद वागणूकीच्या तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. रुग्णालयात गुटखा, खर्रा आदी प्रतिबंधित पदार्थ, भटकी कुत्री येता कामा नये. सुरक्षा आणि निगराणीच्या दृष्टीने १२८ सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाला आणि १०० वाढीव सुरक्षा रक्षकांची सेवा घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी बैठकीत सांगितले.
परिसरात येणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्याविरुद्ध कारवाई करावी. सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची शेवटची संधी देण्यात येत आहे. सुरक्षा रक्षकांचे संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावावेत. नियंत्रणासाठी प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी. रुग्णालयात स्वच्छता ठेवावी. रुग्णांच्या नोंदणी, शस्त्रक्रियेची माहिती, तक्रारींसाठी ॲानलाईन सुविधा सुरु करा तसेच रुग्णालयातील तक्रार निवारण कक्ष २४ तास सुरु ठेवावे. एमआरआयसाठी रुग्णांकडून दोन हजार रुपये आकारले जातात. एमआरआय माफक दरात मिळावे यासाठी महाविद्यालयाला निधी उपलब्ध करुन दिला जाईल. सामाजिक उत्तरदायित्व निधीसाठी समिती कार्यान्वित करावी. रुग्णांना सकस आहार द्यावा. ओपीडी, एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन उपकरणे सुसज्ज ठेवावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. अमरावतीच्या धर्तीवर सिकलसेल रुग्णांसाठी स्वतंत्र वार्ड सुरु करावे. आशा स्वयंसेविका, कैदींसाठीही वार्ड सुरु करावे. महाविद्यालय स्तरावरील पायाभूत सुविधांची कामे महिन्याभरात करावीत, असे निर्देश देवून रिक्त पदभरती, प्राध्यापकांची नेमणूक आणि वैद्यकीय महाविद्यालयातील शासनस्तरावरील विषयांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. राठोड यांनी सांगितले. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अल्पदरात सेवा उपलब्ध करण्यात यावी, अशी सूचना आमदार मदन येरावार यांनी यावेळी केली होती. याविषयी प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी आरोग्य संचालकांना दिले. रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ताण वाढत असल्याचे सांगण्यात आले. गर्भवती महिलांच्या प्रसूतीविषयी तक्रारी आहेत. नॅार्मल प्रसूतींसाठी स्त्री रुग्णालयाची मदत घ्यावी. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांसमवेत बैठक घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यावेळी डायलिसिस, नोंदणी, रक्त तपासणी विभाग, साधनसामुग्री, औषध पुरवठाबाबत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी