शासन आपल्या दारी अभियान : ६६ हजार शेतकऱ्यांना २५३ कोटींचे प्रोत्साहन अनुदान

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ :
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन मिळावे यासाठी अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान या योजनेंतर्गत दिले जाते. या योजनेतून जिल्ह्यातील ६६ हजार ८०६ शेतकऱ्यांना २५३ कोटी ७२ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर लाभाचे वितरण ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमादरम्यान करण्यात आले आहे. या योजनेचा शुभारंभ ऑक्टोबर २०२२ मध्ये करण्यात आला होता. शेती व शेतीशी निगडीत कामांकरिता शेतकरी व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतात. सन २०१५-१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळसदृश परिस्थती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. काही भागात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नव्हती. परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे शेती कामासाठी नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. शेतकऱ्यांची परिस्थिती विचारात घेऊन ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली.
पिककर्जाची उचल करुन नियमितपणे मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दिलासा व प्रोत्साहन मिळावे यासाठी अशा पात्र शेतकऱ्यांना ५० हजाराचे अनुदान कर्जमुक्ती योजनेतून दिले जात आहे. या प्रोत्साहनपर योजनेंतर्गत आर्णी तालुक्यातील ५ हजार ८७५ शेतकऱ्यांना २१ कोटी ६५ लाख, बाभूळगाव तालुक्यातील २ हजार ५७३ शेतकऱ्यांना १० कोटी २० लाख, दारव्हा २ हजार २७६ शेतकऱ्यांनी ९ कोटी ४४ लाख, दिग्रस ४ हजार ९१६ शेतकऱ्यांना १७ कोटी ५० लाख, घाटंजी ३ हजार ६३१ शेतकऱ्यांना १४ कोटी ७२ लाख, कळंब १ हजार ९४३ शेतकऱ्यांना ८ कोटी ४४ लाख, केळापूर २ हजार ५५५ शेतकऱ्यांना ११ कोटी ४६ लाख, महागाव ३ हजार ७१० शेतकऱ्यांना १२ कोटी ६९ लाखाचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे. मारेगाव तालुक्यातील ३ हजार ८५१ शेतकऱ्यांना १६ कोटी २५ लाख, नेर २ हजार २२३ शेतकऱ्यांना८ कोटी २७ लाख, पुसद ९ हजार १८६ शेतकऱ्यांना २७ कोटी ९३ लाख, राळेगाव ४ हजार ३०९ शेतकऱ्यांना १७ कोटी २१ लाख, उमरखेड ७ हजार ७६२ शेतकऱ्यांना २६ कोटी ८०, वणी ७ हजार १४९ शेतकऱ्यांना ३१ कोटी ८१ लाख, यवतमाळ २ हजार ९४ शेतकऱ्यांना ८ कोटी १७ लाख आणि झरी जामणी तालुक्यातील २ हजार ७५३ शेतकऱ्यांना ११ कोटी १२ लाख असे एकूण ६६ हजार ८०६ नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५३ कोटी ७२ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आले आहे. नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०१७-१८, सन २०१८-१९ आणि सन २०१९-२० हा कालावधी विचारात घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. सन २०१९ मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा या योजनेस पात्र होते. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारससुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र ठरविण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी