जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत १३ डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालत
जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत १३ डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालत
यवतमाळ, दि.30 (जिमाका) : राष्ट्रीय व राज्य विधीसेवा प्राधिकरणाच्या निर्देशाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनात दि.13 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकारांनी आपली प्रलंबित व दाखलपुर्व जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीसाठी ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही लोकअदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तकार निवारण मंच आणि इतर सर्व न्यायालये तसेच न्यायाधिकरणे येथे होणार आहे.
तज्ज्ञांची मदत मिळेल
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई, भू-अर्जन मामले, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे दोहोंतील तडजोडीने निकाली निघणार आहेत. लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याकरीता न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ पक्षकारांस मदत करतील.
कोणतीही फी नाही
लोकअदालतीमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. लोकअदालतीच्या निवाड्याविरूध्द अपील नसल्याने वाद कायमचा मिटतो. न्यायालयाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोकअदालतीमध्ये होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते. खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलट तपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात. वाद मिटविल्याने वेळ व पैशाची बचत होते. तसेच प्रकरण न्यायालयात चालविण्याकरिता होणाऱ्या त्रासातून सुटका होते व त्वरित परस्पर संमतीने न्याय मिळतो.
पक्षकारांनी आपली प्रकरणे दिनांक 13 डिसेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्याकरिता प्रलंबित प्रकरणांसाठी संबंधित न्यायालयात अर्ज सादर करावा आणि दाखलपूर्व प्रकरणांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधून जास्तीत जास्त प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव दिपक दाभाडे, जिल्हा वकील संघाचे संजय जैन यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment