‘मनरेगा’ मजुरांसाठी फेस ई-केवायसी अनिवार्य ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करा: प्रशासनाचे आवाहन
यवतमाळ,दि.29(जिमाका):महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरांसाठी फेस ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. या प्रक्रियेद्वारे प्रत्येक मजुराची ओळख मोबाईल अॅपच्या माध्यमातून प्रमाणित करण्यात येणार असून, ग्राम रोजगार सहाय्यक यांच्या मदतीने ही प्रक्रिया संबंधित मजुरांना आपल्या गावातच पूर्ण करता येणार आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या प्रक्रियेसाठी ग्राम रोजगार सहाय्यकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून, ३१ ऑक्टोबर पर्यंत सर्व मजुरांनी आपली फेस ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सध्या एकूण ४ लक्ष २३ हजार ९७६ सक्रिय मजुरांपैकी १ लक्ष २१ हजार ४० मजुरांची फेस ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित मजुरांनी तातडीने आपल्या ग्राम रोजगार सहाय्यक व तांत्रिक सहाय्यकांशी संपर्क साधून प्रक्रिया पूर्ण करावी, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.फेस ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच मजुरांची माहिती नरेगा संकेतस्थळावर नोंदविली जाईल. यामुळे ज्यांची फेस ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, त्यांच्या उपस्थितीची नोंद होणार नाही आणि त्यांना मजुरी मिळू शकणार नाही.
एमजीएनआरईजीए योजनेंतर्गत सिंचन विहिरी, फळबाग लागवड, तुती लागवड, शेततळे, गोठे, वृक्षलागवड, पाणंद रस्ते अशा अनेक कामांमुळे शेतकरी व मजुरांना मोठा लाभ झाला आहे. या लाभ वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी केंद्र शासनाने फेस ई-केवायसी अनिवार्य केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
000000
--
Comments
Post a Comment