मिनी ट्रॅक्टरचे अनुदान थेट बँक खात्यात
*योजनेच्या नियमात अमुलाग्र बदल
*3 लाख 15 हजार रूपयांचे अनुदान
*स्वयंसहाय्यता बचतगटांना होणार लाभ
            यवतमाळ, दि. 18 : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना अनुदानावर मिनी ट्रॅक्टरचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेत अमुलाग्र बदल करण्यात आले आहे. उपसाधनासह मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी 3 लाख 15 हजार रूपये गटाच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
            या योजनेच्या लाभासाठी गटामध्ये 80 टक्के अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सदस्य असावे, गटाचे अध्यक्ष आणि सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सदस्य असावे, गटाच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे, हे खाते अध्यक्ष आणि सचिवांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असावे, गटाने खरेदी केलेला मिनी ट्रॅक्टर तयची उपसाधने ही केंद्र शासनाच्या कृषि विभागाने ठरवून दिलेल्या मानकानुसार फार्म, मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टींग इंन्स्टिट्यूट यांनी टेस्ट करून जाहिर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमानानुसार असावेत. पात्र स्वयंसहायता बचत गटांना शासनाने संबंधित जिल्ह्यासाठी निश्चित करून दिलेल्या उद्दिष्टांनुसार अर्थसहाय्य मंजूर करून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील. गटाला मिनी ट्रॅक्टर चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. मंजूर करण्यात आलेले मिनी ट्रॅक्‍टर विकता येणार नाही, तसेच तो ट्रॅक्टर गहाण ठेवता येणार नाही, अशा आशयाचे हमीपत्र गटाला द्यावे लागेल. तसेच पुढे प्रत्येक वर्षी 10 वर्षापर्यंत त्याबाबत प्रमाणपत्रास मंजुरी देणाऱ्या प्राधिकाऱ्याकडे सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
00000

पोलिओबाबत आरोग्य अधिकारी कार्यशाळा
यवतमाळ, दि. 18 : जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी कार्यालयातील सर्व वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्‍य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची संशयित पोलिओ रूग्‍ण, गोवर लसीकरण, लसीकरणामुळे उद्भवणारी गुंतागुंत याबाबत गुरूवारी, दि.16 मार्च रोजी कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेत अकोला येथील जागतिक आरोग्य संघटनेचे पोलिओ सर्वेलन्‍स वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. ठोसर, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक डॉ. टी. जी. धोटे, सहायक संचालक कुष्‍ठरोग डॉ. डी. डी. भगत, जिल्‍हा हिवताप अधिकारी डॉ. लव्‍हाळे, जिल्‍हा माता बाल संगोपण अधिकारी डॉ. पी. एस. चव्‍हाण, डॉ. ढोले, डॉ. कोषटवार आदी उपस्‍थ‍ित होते.
डॉ. ठोसर यांनी संशयित पोलिओ रूग्‍ण, गोवर लसीकरण, लसीकरणामुळे उद्भवणारी गुंतागुंत याबाबत विस्‍तृत माहिती दिली. पाच वर्षे वयोगटातील कोणतेही बालक लसीकरणातून सुटू नये, गोवर तसेच इतर विषाणूजन्‍य आजाराबाबत जागरूक राहून तात्‍काळ उपाययोजना कराव्यात आणि त्‍या परिसराचे सर्वेक्षण करून रक्‍त नमुने, विष्‍ठा नमुने  प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्‍याचे आवाहन केले.
डॉ. के. झेड. राठोड यांनी आरोग्‍य व्‍यवस्‍थापन पद्धतीबाबत माहिती, माहिती संकलन, उद्देश, अहवाल सादरीकरण, राज्‍य आणि केंद्र संगणकप्रणाली, डाटा एन्‍ट्री, मानव विकास मिशन, माता व बाल मृत्‍यू याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. डी. डी भगत यांनी 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्‍याचे आवाहन केले.
जिल्‍ह्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान तसेच गर्भपात होऊ नये, यासाठी तालुकास्‍तरावर देखरेख समित्‍या स्‍थापून सर्व नर्सिंग हॉस्‍पीटलची तपासणी करावी, तसेच बोगस डॉक्‍टर शोध मोहिम राबवावी, अशा प्रकाराबाबत सतर्क राहण्‍याच्या सूचनाही डॉ. धोटे आणि डॉ. राठोड यांनी दिल्या. डॉ. पी. एस. चव्‍हाण आणि डॉ. लव्‍हाळे यांनी मार्गदर्शन केले.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी