आज पोलिओ महिमेचा दुसरा टप्पा
*बालकांच्या आधार नोंदणीसाठी 85 संच
यवतमाळ, दि. 1 :  पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा दुसरा टप्पा रविवारी, दि. 2 एप्रिल रोजी राबविण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. या मोहिमेंतर्गत बालकांच्या आधार नोंदणीसाठी प्रशासनाने 85 संच उपलब्ध करून देण्यात आले आहे.
जिल्ह्यात ग्रामीण 2 हजार 352 आणि शहरी 285 असे एकूण 2 हजार 637 बुथ, तसेच ग्रामीण 215 आणि शहरी 88 असे एकूण 303 ट्रांझिस्‍ट टीम आणि ग्रामीण 117 आणि शहरी 10 असे एकूण 127 मोबाईल   टीमद्वारे जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील एकूण अपेक्षित लाभार्थी ग्रामीण 1 लाख 94 हजार 217 आणि शहरी 57 हजार 299 असे एकूण 2 लाख 51 हजार 516 बालकांना पोलिओ लस पाजण्यात येणार आहे.
ज्या बालकांना पल्स पोलिओ बुथवर काही कारणास्तव पोलिओ लस पाजण्यात आली नाही, अशा लाभार्थ्यांचा गृहभेटीद्वारे कर्मचाऱ्यांमार्फत शोध घेऊन पोलिओ लस पाजण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गाव वाडी, पोड, पाडा, तांडा, मळा, यात्रा, बाजार, बस थांबा तसेच प्रवासातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिदेच्या सर्व विभागप्रमुखांना पर्यवेक्षणासाठी तालुके वाटप करण्यात आले आहे. तसेच पल्स पोलिओ लसीकरणाच्या दिवशी बुथ आणि जोखीमग्रस्त भाग (विटभट्या, ऊसतोड कामगार वसाहत, मेंढपाळ, पोड, पाडे, तांडे व शहरी झोपडपट्ट्या) यांना भेटी देऊन पोलिओच्या लसीपासून 5 वर्षाच्या आतील बालके सुटणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला यांनी निर्देश दिले आहेत.
या मोहिमेमध्ये (bOPV) बायव्हॅलन्ट लसीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांच्या पालकांनी आपले बालक या लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, बाळ नुकतेच जन्मले असले तरीही, यापुर्वी दिलेले असले तरीही, बाळ आजारी असले तरीही लस देण्यात यावी. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसोबतच पोलिओ बुथवरील कर्मचाऱ्यांना आपल्या 0 ते 5 वयोगटातील बालकांची आधार कार्ड नोंदणबाबत माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. ज्या बालकांची आधार नोंदणी झालेली नाही त्यांच्यासाठी जिल्ह्यामध्ये 85 आधारकार्ड नोंदणी युनिट शासनाने उपलब्ध करुन दिले आहेत. त्याकरीता लाभार्थीचे आई किंवा वडिलांचे आधारकार्ड आणि बालकाचा जन्म दाखला घेऊन नोंदणी करावी लागणार आहे.
पल्स पोलिओ मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आरोग्याची सर्व यंत्रणा सक्रीय करण्यात आली आहे. विविध सामाजिक संघटना रोटरी क्लब, आयएमए तसेच प्रत्येक शाळेवर प्रभात फेरी काढून मोहिमेची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड यांनी केले आहे.                                           
00000
एमपीएससीतील गैरप्रकार रोखण्यासाठी उपायोजना
यवतमाळ, दि. 1 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवारी, दि. 2 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहे.
लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील कॉपी, गैरप्रकारांची गंभीरपणे दखल घेण्यात आली आहे. असे प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गन्हे दाखल करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहे. तसेच या परीक्षेसाठी आयोगाने कडक उपाययोजना केल्या आहे. यात परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची पोलिस कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक आणि भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. या परीक्षेवर जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत.
00000



Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी