पीसीआय इन्डेक्सनुसार रस्त्यांच्या प्राथम्यक्रम याद्या तयार
इन्डेक्सबाबत आक्षेप असल्यास नोंदविण्याचे आवाहन
        यवतमाळ, दि.13 : जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत असलेल्या इतर जिल्हा व ग्रामिण मार्गाचे पेव्हमेंट कंडिशन इन्डेक्सच्या (पीसीआय) आधारे रस्त्याच्या दर्जाच्या वेगवेगळ्या प्राथम्यक्रम याद्या तयार करण्यात आल्या आहे. या प्राथम्यक्रमाबाबत आक्षेप असल्यास संबंधीतांनी नोंदवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.
            जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे दोन स्वतंत्र विभाग असून बांधकाम विभाग क्र.1 कडे यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, राळेगाव, पांढरकवडा, घाटंजी, वणी, झरी जामणी, मारेगाव तर बांधकाम विभाग क्र.2  कडे दारव्हा, आर्णी,  पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस, नेर ही तालुके जोडण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या या बांधकाम विभागाकडे असलेल्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामिण मार्गाचे शासन निर्णयान्वये सर्वेक्षण करण्यात आले असून रस्त्याच्या आजच्या स्थितीनुसार पेव्हमेंट कंडिशन इन्डेक्सच्या आधारे रस्त्यांचा दर्जा व त्यानुसार प्राथम्यक्रम याद्या तयार करण्यात आल्या आहे.
            सदर पीसीआय रस्त्यावरून जीप वा कार चालवून त्याच्या वाहतूकीच्या निर्देशानुसार सदर दर्जा ठरविण्यात आला. त्यानुसार निकष व गुणांकण करण्यात आले आहे. जीप किंवा कार चालवितांना 40 किमीपेक्षा जास्त वेगाने गेल्यास त्या रस्त्यास अतिशय चांगला समजून पीसीआय गुणांकण पाच देण्यात आले आहे. 30 ते 40 किमी वेगाने वाहन गेल्यास चांगला समजून चार गुणांकण, 20 ते 30 किमी दरम्यान साधारण तीन गुणांकण, 10 ते 20 किमी दरम्यान वाईट वा खराब दोन गुणांकण तर सर्वेक्षण दरम्यान जीप किंवा कार र स्त्यावरून केवळ 10 किमी तासी वेगाने चालवावी लागली. अशा रस्त्यांना अतिशय वाईट,  खराब समजून एक गुण देण्यात  आला आहे.
            जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत असलेल्या सर्व रस्त्यांचे या आधारे पीसीआय इंन्डेक्स करण्यात आले असून गुणांकण करण्यात आले आहे. सर्व रस्ते व त्यांचे गुणांकण असलेल्या याद्या जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहे. या गुणांकणाबाबत कुणास काही आक्षेप असल्यास संबंधीतांनी जिल्हा परिषद बांधकामच्या कार्यकारी अभियंता किंवा उपअभियंत्यांच्या कार्यालयात यादी प्रकाशीत झाल्यापासून 15 दिवस किंवा 27 जून पर्यंत लेखी स्वरूपात नोंदवावे. त्यानंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
000000
वृत्त क्र.544
कापसावरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना
        यवतमाळ, दि.13 : जिल्ह्यात गेल्यावर्षी कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला होता. यावर्षी या पिकावर हा रोग आढळू नये म्हणून नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाने सुचविलेल्या उपाययोजना करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
            गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण एकात्मिक पध्दतीने करणे आवश्यक आहे. जमीनीची खोल नांगरट करून यावर नियंत्रण मिळविता येते. तसेच पिकाची फेरफार करणे आवश्यक आहे. कापसावर कापूस घेतल्यास परत या गुलाबी बोंडअळीचे कोष जमीनीत राहतात. पाऊस पडल्यानंतर त्यातून पतंग बाहेर पडते व ती कोवळ्या फुलावर अंडे देते. ती फुलावरची अंडी बोंडात जावून बोंडाचा आतला भाग खाते. यासाठी कापूस फुलावर असतांना योग्य किटकनाशकाची योग्य फवारणी करणे आवश्यक आहे. बीटी बॅगसोबत आलेले नॉन बीटी बियाणे पेरणे आवश्यक आहे. शेतामध्ये पक्षी थांबे तयार करावे. हे पक्षी बोंडअळींना खाऊन नष्ट करतात. कापसाचा हंगाम संपताच शेतातील पाला, पाचोळा खड्यात टाकून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे.
            बियाणे खरेदी करतांना अधिकृत परवानाधारकांकडूनच करावे. खरेदी केल्याचे पक्के बिल घ्यावे. पाकीट सिलबंद, मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावरची अंतीम मुदत तपासावी. बोलगार्ड 2 मध्ये उपलब्ध असलेल्या वाणाची शासनमान्य दराने खरेदी करावी. जादा दराने मागणी केल्यास कृषी  विभागाशी संपर्क साधावे, असे कृषी विकास अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
वृत्त क्र.545
आर्णी येथील वसतीगृहासाठी प्रवेश
        यवतमाळ, दि.13 : आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, आर्णी येथील वसतीगृह प्रवेशासाठी वर्ग 8, 11, पदवी, पदव्युत्तर करीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
            प्रवेशासाठी विद्यार्थीनी अनुसूचित जमातीचे असावे. वसतीगृहात प्रवेशित विद्यार्थींना नि:शुल्क भोजन व निवास व्यवस्था पुरविण्यात येईल. तसेच निर्वाह भत्ता व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना देय असलेली रक्कम डिबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. करीता वर्ग 8, 11, पदवी, पदव्युत्तरसाठी वसतीगृहात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थींनी  ऑनलॉईन अर्ज करावे, असे आवाहन वसतीगृहाच्या गृहपालांनी केले आहे.
000000
वृत्त क्र.546
डॉ.भालचंद्र स्मृती दृष्टीदिन कार्यक्रम साजरा
        यवतमाळ, दि.13 : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्यावतीने अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डॉ.भालचंद्र स्मृती दृष्टीदिन कार्यक्रमाचे आयोजन आयुर्वेदिक महाविद्यालय येथे करण्यात आले होते.
            यावेळी अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तथा नेत्रतज्ञ डॉ.मनोज सक्तेपाल, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज तगडपल्लीवार, नेत्र शल्य चिकित्सक डॉ.स्मिता चव्हाण, जिल्हा नोडल ऑफीसर एस.आर.वरझाळे, नेत्र चिकित्सा अधिकारी एस.एस.कान्नव, नेत्रदान समोपदेशक सोनाली घायवान, कविता पाठक, अंजली रिठे, प्राचार्या श्रीमती प्रधान, अर्चना शहारे, श्री.गजभिये आदी उपस्थित होते.
            सदर आयोजन शासकीय नर्सिंग कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. त्यानिमित्त एसटी बस स्टँड परिसरामध्ये नेत्रदान श्रेष्ठदान या विषयावर आधारीत पथनाट्यचे आयोजन करण्यात आले होते. पथनाट्यातून नेत्रदानाची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त पोस्टर प्रदर्शन घेण्यात आले. तसेच नेत्रदानाची माहिती देणारे माहितीपत्रक वितरीत करण्यात आले. यावेळी नेत्रदान समुपदेशक सोनाली घायवान यांनी निसर्गाची अद्भुत किमया अंधांनाही पाहता यावी म्हणून मानवतेच्या दृष्टीकोनातून मृत्युनंतर आपले नेत्रदान करावे, असे आवाहन केले.
000000
वृत्त क्र.547
सैनिकी मुलींच्या वसतीगृहासाठी अर्ज आमंत्रित
यवतमाळ, दि. 13 : येथील शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या विरमाता रमाबाई पंडीत व जनरल पंडीत सैनिकी मुलींच्या वसतीगृहात सैनिकांच्या मुलींना प्रवेश देण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहे. यवतमाळ येथील शाळा, महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या युध्द विधवा, माजी सैनिक विधवा, आजी-माजी सैनिकांच्या मुलींना वसतीगृहात प्रवेश दिला जाईल.
            वसतीगृह प्रवेशासाठी सवलतीच्या दरात शुल्क आकारण्यात येईल. तसेच भोजन, ‍निवास व सेवाकर शुल्क मोफत राहील. वसतीगृहात जागा शिल्लक असल्यास इतर नागरीकांच्या पाल्यांनाही प्रवेश दिला जाईल. इच्छुकांनी आपल्या मुलीच्या प्रवेशासाठी संपर्क साधावा व येतांना ओळखपत्र व डिस्चार्ज पुस्तक, प्रवेश घेतलेल्या शाळा महाविद्यालयातील बोनाफाईट प्रमाणपत्र सोबत आणावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सैनिकी मुलींचे वसतीगृह यवतमाळ तसेच 07232-245273 व वसतीगृह येथे 07232-241449 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0000000
वृत्त क्र.548
तंबाखु नियंत्रणासाठी ठिकठिकाणी जनजागृती कार्यक्रम
यवतमाळ, दि.13 : जागतिक तंबाखु  नकार दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्यावतीने राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत संकल्प व्यसनमुक्ती केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्याहस्ते तंबाखु नकार दिनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात फित कापून सप्ताहाचे उद्घाटन झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, नितीन व्यवहारे, जिल्हा सुचना व विद्यान अधिकारी राजेश देवते, जिल्हा शल्य‍ चिकित्सक डॉ.टि.जी.धोटे, मानसोपचार तज्ञ डॉ.मेश्राम, भारतीय दंत परिषदेचे अध्यक्ष डॉ.पदमावार, मुखरोग तज्ञ डॉ.छत्ताणी, डॉ.निखील मानकर आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर कर्मचाऱ्यांची मोफत मौखिक तपासणी व समोपदेशन करण्यात आले. 58 कर्मचाऱ्यांनी आपली मौखिक तपासणी यावेळी करून घेतली.
तंबाखुच्या दुष्परिणामावर प्रकाश टाकण्यासाठी बसस्थानक परिसरात जनजागृतीपर पथनाट्याचेही आयोजन करण्यात  आले होते. यावेळी  तंबाखुमुळे होणाऱ्या आजारांची माहिती देण्यात आली. पथनाट्याचे सादरीकरण संदेश जोगळेकर व त्यांच्या सहकार्यांनी केले. यासाठी संकल्प व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प अधिकारी गंगाधर खंदारे यांनी मोलाचे सहकार्य केले. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी समुपदेशक मोहित पोहेकर, सामाजिक कार्यकर्ते सागर परोपटे, समुपदेशक सरफराज सौदागर यांनी सहकार्य केले.
000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी