तंबाखु नकार दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
यवतमाळ, दि. 16 : जागतिक तंबाखु नकार दिनानिमित्त तंबाखु विरोधी दिन सप्ताहाचे आयोजन राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम व सलाम मुंबई फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले होते. या अंतर्गत  आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक दिवशीय प्रशिक्षण घेण्यात आले.
सदर प्रशिक्षण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.टी.जी.धोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड.राठोड यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज तगलपल्लेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून दंतरोग तज्ञ डॉ.चेतन दरणे व प्रशिक्षक म्हणून डॉ.हिमांशु गुप्ते, डॉ.वैभव थावल उपस्थित होते.
डॉ.दरणे यांनी तंबाखु नकार दिन का साजरा केला जातो याची माहिती दिली. डॉ.तगलपल्लेवार यांनी तंबाखु सेवनाचे दुष्परिणाम तसेच यामुळे होणाऱ्या आजारांवर प्रकाश टाकला. उपस्थित दोन प्रशिक्षकांनी आपले आरोग्य तंबाखुमुक्त कसे राहतील याबाबत समुपदेशन केले. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाचे सागर परोपटे यांनी केले तर आभार मोहित पोहेकर यांनी मानले.
00000
वृत्त क्र.562
केरोसिनचे जून महिन्यासाठी नियतन मंजूर
यवतमाळ दि. 16 : जिल्ह्यातील सिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्यासाठी जून महिन्यांचे केरोसिन नियतन मंजूर झाले असून नागरीकांना वितरीत करण्यासाठी सदर नियतन घाऊक, अर्धघाऊन परवानाधरकांना उचल करण्याबाबत कळविण्यात आले आहे. 888 केएल केरोसिनचा यात समावेश आहे.
नियतनाबाबत सर्व तहसिलदारांना कळविण्यात आले असून सिधापत्रिकाधारकांना त्यांना देय असलेल्या प्रमाणात वितरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यानुसार परवानाधारकांनी मुदतीत नियतनाची उचल करून त्याचे वाटप करावयाचे आहे. उचल उशिरा केल्यास मुदत वाढ देण्यात येणार नाही. तसेच वाटप व्यवस्थित होते किंवा नाही यावर लक्ष ठेवण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहे.
केरोसिनचे वाटप आकारणी करण्यात आलेल्या दरातच करावयाचा आहे. महिन्याच्या अखेरच्या तारखेस तालुका निहाय वाटपाची यादी सादर करणे आवश्यक आहे. या महिन्यासाठी 888 केएल इतक्या केरोसिन वाटपाचे नियतन करण्यात आले असून यापैकी 396  केएल नियतन द्वार वितरण प्रणाली अंतर्गत वितरीत करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
00000
वृत्त क्र.563
पोलीस पाटील पदासाठी लेखी परिक्षा
यवतमाळ दि. 16 : दारव्हा व नेर तालुक्यातील ज्या गावांमध्ये पोलीस पाटलाची पदे रिक्त आहे. अशा गावात सदर पद भरण्यासाठी जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला असून त्यानुसार सदर पदासाठी दिनांक 20 जून रोजी लेखी व तोंडी परिक्षा घेतली जाणार आहे.
दारव्हा तालुक्यातील रामगाव रा., मुंडळ, वडगाव आंध, पिंपरी खु., लोही, हरू, कुऱ्हाड बु., तळेगाव, मांगला इ., राजीवनगर, दर्यापूर तसेच नेर तालुक्यातील सोनखास, खोलापूरी, दहीफळ, फत्तापूर, बांधगाव, धनज, लोणी, ब्राम्हणवाडा, आजंती, पिंपळगाव डुबा, बोरगाव, लिंगा या गावासाठी पोलीस पाटील पदाची पदे भरण्यात येणार आहे.
सदर पदासाठी दिनांक 20 जून रोजी सकाळी 10 ते 11.30 दरम्यान लेखी परिक्षा घेण्यात येईल. दुपारी 12.30 ते 2.30 या दरम्यान परिक्षा पेपरची तपासणी केली जातील. दुपारी 2.30 वाजता मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, दारव्हा येथे व परिक्षा केंद्रावर यादी प्रसिध्द केली जाईल. तसेच संबंधीत उमेदवारांना एसएमएस पाठविले जातील. दुपारी 3.30 वाजता पात्र  उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येईल. व याच दिवशी मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जातील. लेखी व तोंडी परिक्षा एकाचवेळी होणार असल्याने उमेदवारांनी आपले दहावी, बारावी, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच उच्च शैक्षणिक अर्हता व एमएससीआयटी,  एनसीसी, एमसीसी, स्काऊट खेळातील प्राविण्य आदी मुळ  प्रमाणपत्र व त्याचा एक झेरॉक्स संच सोबत आणावा, असे उपविभागीय दंडाधिकारी, दारव्हा यांनी  कळविले आहे.
00000
वृत्त क्र.564
युवा मंडळ विकास कार्यक्रम
यवतमाळ दि. 16 : नेहरु युवा केंद्राच्यावतीने दिनांक 19  जूनपर्यंत घाटंजी व आर्णी तालक्यामध्ये युवामंडळ विकास कार्यक्रमांतर्गत  युवा मंडळ स्थापन करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
युवकांना सशक्त करण्यासाठी सदर मंडळ गावोगावी स्थापन करण्याचा अनुषंगाने केंद्राचे चमु या तालुक्यातील गावांमध्ये युवक मंडळ, महिला मंडळ, बचतगट, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी येथे भेटी देवून गावातील 15 ते 29 या वयोगटातील युवकांचे मंडळ स्थापन करून त्यांना नेहरू युवा केंद्रासोबत जोडतील. दोन्ही तालुक्यातील युवकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नेहरू युवा केंद्राच्यावतीने करण्यात  आले आहे.
या मंडळामार्फत युवकांच्या विकासासोबतच सांस्कृतिक व विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जात असतात, असे केंद्राचे अनिल ढेंगे, केंद्राच्या राष्ट्रीय युवा कॉरर्प्सचे शुभम खोडे, प्र फुल जाधव, रुतू राठोड यांनी कळविले आहे.
00000
वृत्त क्र.564
शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा
यवतमाळ दि. 16 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे दिनांक 29 जून रोजी सकाळी 11 वाजता विविध व्यवसायक्रम उत्तीर्ण व अंतिम सत्रात प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
फिटर, टर्नर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राईंडर, टुल ॲन्ड डाय मेकर, वेल्डर, सिट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशीयन या व्यवसायाचे उत्तीर्ण तथा अंतिम सत्राचे प्रशिक्षणार्थी या मेळाव्याचा लाभ घेवू शकते. भरती मेळाव्यात औरंगाबाद येथील एन.आर.बी. बिअरींग लिमिटेड आणि रुचा इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड या दोन आस्थापना सहभागी होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथील मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्राच्या अंशकालीन प्राचार्यांनी कळविले आहे.
00000
वृत्त क्र.565
थकबाकीदार शेतकऱ्यांना शासन हमीवर तातडीने 10 हजार कर्ज
यवतमाळ दि.16. : राज्य शासनाचे दिनांक 14 जूनच्या शासन निर्णयानुसार दिनांक 30 जुन 2016 रोजीच्या थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी 10 हजारच्या मर्यादेपर्यत कर्ज शासन हमीवर तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निदेश बँकांना देण्यात आले आहे. त्यानुसार तातडीने सदर कर्ज वितरीक केले जाणार आहे.
            बँकांनी दिनांक 30 जुन 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना 10 हजार रूपयांचे कर्ज देण्याबाबत निर्देश दिले आहे. जिल्हा मध्यवर्ती तसेच व्यापारी बँकांनी खरीप 2017 या हंगामासाठी तातडीने कर्ज उपलब्ध करुन द्यावे, सदर कर्ज घेण्याकरीता शेतकऱ्यांना स्वंतत्र खाते उघडावे लागणार आहे. शासन हमीवर देण्यात येणारे कर्ज दहा हाजाराचे कर्ज शासनाकडुन देण्यात येणाऱ्या कर्ज माफीच्या रक्कमेत समायोजित करण्यात येणार आहे. या कर्जाकरीता राज्यातील आजी/माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी / माजी खासदार, राज्यसभा सदस्य, आजी / माजी विधानसभा तथा विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य, महानगरपालीका / नगरपालिकांचे सदस्य, केंन्द्र व राज्य शासकीय कर्मचारी, आयकर भरणारी व्यक्ती, डॉक्टर्स, वकील, अभियंता, चार्टर्ड आकाऊंटंट, नोंदणीकृत कंत्राटदार, सहकारी  बँका, नागरी पत संस्थांचे संचालक हे या दहा हजार रूपयाच्या कर्जाकरीता पात्र राहणार नाही.
            सदर दहा हजाराचे कर्ज मिळण्याकरीता शेतकऱ्यांना शपतथपत्र सादर करावे लागणार आहे. शपथपत्र सादर केल्यानंतर पात्र व्यक्तीला कर्ज देण्यात येणार आहे. कर्ज मिळण्याकरीता शेतकऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बँकेशी संपर्क साधावा तसेच अधिक माहिती करीता तालूका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, यांचेशी संर्पक साधण्याचे आवाहन सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.
00000000
क्र.566
बॅंक शाखास्तरावर सुलभ पिक कर्ज अभियान
यवतमाळ दि.16. :  शासन निर्णयानुसार राज्यातील यवतमाळ जिल्ह्यासह 15 जिल्ह्यात शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून पिक कर्ज वाटपाकरीता सुलभ पिक कर्ज अभियान राबविण्यात येणार आहे. सदर अभियान दिनांक 31 जुलै पर्यंतच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 पिक कर्ज वाटपाचे लक्षांक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंके मार्फत तालूका निहाय ठरविण्यात आले आहे. लक्षांक पुर्ती करीता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व व्यापारी बँकेच्या शाखा असलेल्या गावात कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असुन मेळाव्यास सहाय्यक निबंधक, कृषि सहाय्यक, ग्राम विकास अधिकारी, संबंधित बँकेचे अधिकारी, संबंधीत गावांतील तलाठी, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधीत शाखेचे निरिक्षक व संबंधीत विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सचिव उपस्थित राहणार आहे.
            कर्ज मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या शेतकऱ्यांचा 7/12 उतारा, 8अ व 6 ड उतारा गांव कामगार तलाठी यांनी उपलब्ध करुन द्यावयाचा आहे. या शेतकऱ्यांकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या कर्जाची थकबाकी नसल्याबाबत व अशा शेतकऱ्यांना व्यापारी बँकेमार्फत पीक कर्ज पुरवठा करण्याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेने नाहरकत दाखल द्यावयाचा आहे.
            जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समिती आठवडयाच्या प्रत्येक सोमवारी सुलभ पिक कर्ज अभियानाचा आढावा घेणार आहे. तालुक्यातील सुलभ् पिक कर्ज मेळाव्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहुन मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.
00000000



Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी