प्रधानमंत्री कार्यालयाच्यावतीने महाराष्ट्र अहेडचे कौतुक
यवतमाळ दि.17 : केंद्र शासनाला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित ३ इयर ऑफ रिबिल्डींग इंडियाशीर्षकाखालील महाराष्ट्र अहेड या राज्य शासनाच्या मुखपत्राचे  प्रधानमंत्री कार्यालयाद्वारे आज ट्वीट करून कौतुक करण्यात आले आहे.
        माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना व कामांची माहिती जनते पर्यंत पोहचविण्यासाठी दर्जेदार मासिक प्रकाशित करण्याची दिर्घ परंपरा आहे. केंद्र शासनाला तीन वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने महासंचालनालयाच्यावतीने माहे मे २०१७ चा विशेषांक काढण्यात आला. मराठी, इंग्रजी, हिंदी,उर्दु, गुजराती या भाषांमध्ये हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. ३ इयर ऑफ रिबिल्डींग इंडिया या शीर्षकाने महाराष्ट्र अहेड हा इंग्रजी भाषेतील अंक प्रकाशित करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतदेशाने विकास व प्रगतीत घेतलेल्या भरारीचा धांडोळा घेणा-या महाराष्ट्र अहेड या अंकाचे कौतुक प्रधानमंत्री कार्यालयाच्या @PMOIndia या ट्वीटर हँडलहून करण्यात आले आहे. तसेच, महाराष्ट्र अहेड अंकाची पीडीएफ स्वरूपातील लींक या हँडलहून देण्यात आली आहे.
            या अंकात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहीलेला भारताचे नवनिर्माण हा लेख आहे. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या विभागांनी केलेल्या प्रगतीचा आढावा घेणारे दिल्लीतील प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींद्वारे लिखीत विविध लेख व मुलाखती आहेत. तसेच, गेल्या तीन वर्षात राज्य शासनाला केंद्राकडून प्राप्त विविध क्षेत्रातील मदत, केंद्र शासनाने पारदर्शी कारभारासाठी केलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदि विषयांवर लेख प्रकाशित करण्यात आले आहेत.
000000
वृत्त क्र.568                                                       
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांची काळजी घ्या
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन
यवतमाळ, दि. 17 : पावसाळ्याच्या दिवसात दुषित पाण्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा हे जलजन्य आजार होण्याची शक्यता असते. या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा या आजारांवर वेळीच उपचार न झाल्यास ते गंभीर स्वरुप धारण करु शकतात. हे आजार टाळण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून व गाळून पिणे आवश्यक आहे. जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे, उघड्यावरील अन्न पदार्थ आणि शिळे अन्न पदार्थ खावू नये. कॉलरा हा आजार व्हिब्रीओ कॉलरा या विशिष्ट जिवाणूमुळे होते. या आजाराची लागण झाल्यास प्रथमत: जुलाब सुरु होतात व त्यानंतर उलट्याही सुरु होतात.
गॅस्ट्रो हा आजार वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणू आणि विषाणूमुळे होते. या आजारात उलट्या व जुलाब एकाच वेळी सुरु होतात. अतिसार हा आजार जिवाणू आणि विषाणूमुळे होते. या आजारात प्रामुख्याने जुलाब होतात. या आजारांचे लक्षणे दिसताच रुग्णांना ओआरएसचे पाणी पाजणे उपयुक्त ठरते. ओआरएस उपलब्ध नसल्यास भाताची पेज, शरबत, ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी आदी भरपूर प्रमाणात देवून रुग्णास नजीनच्या आरोग्य केंद्रात दाखवावे.
या आजारांवर प्रतिबंध व नियंत्रण ठेवण्यासाठी शुध्द पाणी पिणे आवश्यक आहे. गावातील नळ योजनेची पाईपलाईनची गळती असल्यास तसेच नळ योजनेचे नळ, हातपंप, विहीर आदींच्या 50 फुट आसपास परिसरात घान, चिखल, अस्वच्छता होवू देवू नये. अशी अस्वच्छता आढळल्यास गावकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी. शक्यतोवर उकळलेले पाणी प्यावे. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच उघड्यावर शौचास बसण्याचे टाळावे. शौचावरुन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. उघड्यावरील अन्न खावू नये. आदी प्रकारची काळजी घेतल्यास हे आजार टाळता येणे शक्य आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.
000000
वृत्त क्र.569
वीजेपासून हानी टाळण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 17: मान्सून काळात मराठवाडा व विदर्भात विजेचा कडकडाट, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्त हानी होण्याची शक्यता असते. ही हाणी टाळण्यासाठी पावसाळ्याच्या काळात नागरीकांनी सावध राहण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
नागरिकांनी जिवीत व वित्त हाणी टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे सावधगीरी बाळगावी. आकाशात वीज चमकल्यानंतर दहा सेकंदानी मेघ-गर्जनांचा आवाज आल्यास, तेथे अंदाजे तीन किमी परिसरात वीज पडण्याची शक्यता असते. आपण एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, जवळील घराचा आसरा घेणे आवश्यक आहे. मजबूत असलेले पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. पाण्यात असाल किंवा तलावात काम करीत असाल, ओल्या शेतात रोप लावण्याचे व अन्य  काम करणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे.
पोहणारे, मच्छिमारी करणाऱ्यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर पडावे. शेतात काम करीत असल्यास सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतला नसेल तर शक्यतो जिथे आहात तिथेच रहावे. शक्य असेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पाला-पाचोळा ठेवावा. दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे झुकून बसा. तथापी डोके जमिनीवर ठेऊ नका. धातूपासून बनलेल्या वस्तू जसे कृषी यंत्र इत्यादीपासून दुर रहावे. गाव, शेत, आवार, बाग-बगीचा आणि घर यांच्या भोवती तारेचे कुंपण घालू नका, कारण ते वीजेला सहजतेने आकर्षित करते. छोट्या झाडाखाली उभे राहू नका. उंच जागेवर, झाडावर चढू नका. जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडाचा आसारा घ्यावा. वृक्ष, दलदलीची ठिकाणे तथा पाण्याचे स्त्रोत यापासून शक्यतो दूर रहावे. मोकळ्या आकाशाखाली राहणे आवश्यकच असेल तर खोलगट ठिकाणी रहावे.
एकाच वेळी जास्त व्यक्ती एकत्र राहू नये. दोन व्यक्तीमधील अंतर किमान 15 फूट असेल असे रहावे. धातूची कांडी असलेल्या छत्रीचा उपयोग करु नये. भ्रमणध्वनी टेलीफोन यांना स्पर्श करु नका, वीज वाहक वस्तूपासून दुर रहावे. उदा. रेडीयम, स्टोव्ह, मेटल, लोखंडी पाईप. पाण्याचे नळ, फ्रीज, विद्युत उपकरणे बंद ठेवा, शक्यतो घरातच रहा. प्लग जोडलेले विद्युत उपकरणे हाताळू नका. भ्रमणध्वनी, टेलीफोन यांना स्पर्श करु नका, वीजेवर चालणाऱ्या यंत्रांपासून दुर रहा. टेलीफोन खांब, वीजेचे खांब, टेलीफोन/टेलीव्हीजन टॉवर यापासून दूर रहावे. दोन चाकी वाहन, सायकल, ट्रक, ट्रॅक्टर नौका, यावर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा. अशा वेळी वाहनातून प्रवास करु नका.
वाहनातून प्रवास करत असल्यास वाहनातच रहावे. वाहनाच्या बाहेर थांबणे आवश्यक असल्यास धातुचे कोणतेही उपकरण हातात बाळगु नका. उंच वृक्षाच्या खोड अथवा फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमीनीत खोलवर गाडून ठेवावे म्हणजे हे झाड सुरक्षीत होईल. आपले घर, शेती इत्यादीच्या आस-पास कमी उंचीची चांगल्या प्रतीची फळझाडे लावा. कपडे वाळविण्यासाठी सुतळी अथवा दोरीचा वापर करा. शक्य असल्यास गावाचे वस्तीपासून थोडे दुर असलेल्या उंच ठिकाणी उदा. पाण्याची टाकी वीज अटकाव यंत्रणा बसवावी. वीज पडल्यास मुख्यत: मानवी हृदय व श्वसन प्रक्रीयेत अडथळा येतो. विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाजवळील भागाच्या परिसरात हाताने मालीश करावे व तोंडाने श्वसन प्रक्रीयेत मदत करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.  
0000000
वृत्त क्र.570
इतर मागासवर्गीय महामंडळाच्यावतीने अर्ज आमंत्रित
यवतमाळ, दि. 17 : इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्यावतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या लाभासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महामंडळाची 20 टक्के बीज भांडवल ही योजना आहे. यात लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत, अग्रणी व जिल्हा बँकेच्या माध्यमातून योजनेचा लाभ दिला जाणार आहे. योजनेची अधिकतम मर्यादा पाच लाख असून लाभार्थीचा सहभाग पाच टक्के, बँक 75 टक्के असून यात महामंडळाचा सहभाग 20 टक्के राहणार आहे. महामंडळाचा व्याजदार 6 टक्के तर बँकेच्या रकमेवर त्यांच्या व्याज दराप्रमाणे आकारले दर आकारला जाणार असून 5 वर्षात परतफेड करावयाची आहे.
दुसऱ्या योजनेत उमेदवारांना 25 हजारापर्यंत थेट कर्ज योजना असून शासनाकडून प्राप्त भागभांडवलातून महामंडळ ही योजना राबवित आहे. लाभार्थ्यांना 25 हजारापर्यंत थेट कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून या योजनेसाठी लाभार्थ्यांचा कोणताही भाग राहणार नाही. महामंडळाच्या रकमेवर दोन टक्के व्याज आकारला जाणार असून त्रैमासिक तीन वर्षात रक्कम परतफेड करावी लागेल.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिनांक 10 ऑगस्ट पर्यंत अर्ज वितरीत केल्या जातील. आवश्यक कागदपत्रांसह 14 ऑगस्ट अर्ज स्विकारले जातील. त्यानंतर कालबध्द कार्यक्रम राबवून दिनांक 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत कर्जवाटप प्रक्रीया पूर्ण केली जाणार आहे.  अर्ज महामंडळाच्या सामाजिक न्याय भवन येथील कार्यालयात उपलब्ध होतील आणि तेथेच सादर करावे लागतील. अधिक माहितीसाठी 07232-243052 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
0000000
वृत्त क्र.571
मान्यता नसतांना व क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिल्यास
संबंधीतांवर फौजदारी दाखल होणार
यवतमाळ, दि. 17 : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालकांच्या अधिपत्याखाली असलेल्या द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमासाठी संस्थेला मान्यता नसतांना प्रवेश दिला जावू नये. तसेच मान्यता असलेल्या संस्थांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देवू नये. संस्था चालकांनी या बाबी कटाक्षाने न पाळल्यास त्यांच्या विरोधात फौजदारी व दंडात्मक दोनही स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
अनेक संस्था द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम  चालविण्यासाठी प्रस्ताव दाखल करतात. मात्र मान्यतेच्या शासन निर्णय येण्यापूर्वीच इयत्ता अकरावीमध्ये विद्यार्थ्यांना  प्रवेश देतात. काही मान्यताप्राप्त संस्था मंजूर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देते. नंतर सदर प्रवेश अधिकृत करण्यासाठी प्रस्ताव सादर करतात. ही गैरकायदेशीर बाब आहे. त्यामुळे अधिक प्रवेश संस्था चालकांनी देवू नये. यापुढे मान्यता नसतांना विद्यार्थ्यांना द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमांना अकरावीमध्ये प्रवेश दिल्यास किंवा मान्यताप्राप्त संस्थेस क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी आढळून आल्यास संस्था चालक, संस्था प्रमुख यांच्यावर अनधिकृत प्रवेश अधिनियमामधील प्रकरण 4 अपराध व शास्तीमधील अ.क्र.10 अन्वये (1) कलम 3 च्या पोट कलम (1) किंवा (2) अन्वये फौजदारी व दंडात्मक अशा दोनही स्वरूपाची कार्यवाही केली जाणार आहे. अशावेळी संस्था चालकांच्या नुकसानीसाठी ते स्व:त जबाबदार राहतील, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
0000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी