उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून रोगमुक्त समाजाची निर्मिती - पालकमंत्री मदन येरावार

                            
*वाघापूर, घोडखिंडी, भोसा, तळेगाव येथे लाभार्थ्यांना गॅसचे वाटप
यवतमाळ, दि. 20 : इंधनासाठी जाळण्यात येणा-या लाकडापासून होणारे प्रदुषण हे जवळपास 400 सिगारेटच्या प्रदुषणाएवढे असते. चुलीच्या माध्यमातून होणा-या प्रदुषणामुळे संपूर्ण कुटुंब आरोग्याच्या विळख्यात सापडते. त्याचा परिणाम कुटुंब, समाज आणि देशावर होतो. कुटुंबाला धूरमुक्त करण्यासोबतच उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून रोगमुक्त समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
उज्वला दिनानिमित्त तालुक्यातील वाघापूर, घोडखिंडी, भोसा, तळेगाव येथे उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जि.प.सदस्या रेणू शिंदे, न.प.बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती, नगरसेविका पुष्पा ब्राम्हणकर, किशोर जाजू, तहसीलदार सचिन शेजाळ आदी उपस्थित होते.
1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशच्या बलिया या जिल्ह्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरवात केली, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, राज्यात जवळपास 28 लक्ष कुटुंबाला उज्वला गॅस योजनेचा लाभ मिळाला आहे. यवतमाळ तालुक्यात 16 हजार 778 कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात आजही 10 कोटी कुटुंबाकडे गॅस कनेक्शन नाही. परिणामी त्यांना नैसर्गिक इंधनाद्वारेच घरची चूल पेटवावी लागते. त्यामुळे पर्यावरणाचासुध्दा –हास होतो. या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी पंतप्रधानांच्या एका हाकेवर 2 कोटी श्रीमंत नागरिकांनी गॅसची सबसिडी सोडली. त्यामुळे ही योजना गरीब आणि गरजू लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यात सरकारला यश आले. गॅस कनेक्शन हे केवळ सधनतेचे साधन नाही. तर त्याचा संबंध आपल्या आरोग्याशी निगडीत आहे. सुरवातीला या योजनेत संपूर्ण देशात 5 कोटी कुटुंबांना लाभ देण्यात येणार होता. आता हे उद्दिष्ट 8 कोटीपर्यंत वाढविण्यात आले आहे. अंत्योदय, दारिद्य रेषेखालील कुटुंब, अनुसूचित जाती, जमाती, जंगलालगत राहणारे कुटुंब सर्व या योजनेसाठी पात्र आहेत.
दिवसेंदिवस नैसर्गिक स्त्रोत कमी होत आहे. त्यामुळे इंधनासाठी लाकूड मिळणे दुरापास्त झाले असून वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. हवामानाचे ऋतुचक्रसुध्दा बदलले आहे. म्हणूनच शासनाने तीन वर्षात 50 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. उज्वला गॅस योजनेचा फायदा घेतला तर वृक्षतोडीला लगाम बसेल तसेच निसर्गावरचा भार कमी होईल. या योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत परिसरातील ऐजन्सी पोहचेल. तसेच त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. नागरिकांनी या योजनेचा वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री येरावार यांनी केले.
घोडखिंडी येथील कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते शांती राठोड, रेणुका चिचकार, लता उमाटे, शोभा मडावी, शोभा माजरे आदींना तसेच भोसा येथील कार्यक्रमात अनेकांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रवीण प्रजापती यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशीकांत जाजू यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी