डॉ.बाबासाहेबांचे विचार सर्व समाजापर्यंत जाण्यासाठी उपयुक्त अंक


 महामानवाला अभिवादन’’ लोकराज्य विशेषांकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

यवतमाळ दि.11 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी मुल्ये समाजात रुजविण्याचे महान कार्य केले आहे. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने एप्रिल महिन्याचा ‘महामानवाला अभिवादनʼ लोकराज्य विशेषांक काढला आहे. बाबासाहेबांचे विचार सर्व समाजापर्यंत जाण्यासाठी हा अंक अतिशय उपयुक्त आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
नियोजन सभागृहात पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘महामानवाला अभिवादन’ या विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, विचार व आचारणावर प्रकाशित करण्यात आलेला लोकराज्यचा विशेषांक ख-या अर्थाने डॉ. बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला मानवंदना आहे. सदर अंक अत्यंत वाचनीय आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
या विशेषांकात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची मुलाखत, सर्वांना समान न्याय, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर, परिवर्तनाचे अग्रदूत, जलनीतीचे उद्गाते,  ऊर्जाशक्तीला चालना, उत्कृष्ट संसदपटू आणि शिस्तप्रिय प्रशासक, बाबासाहेबांची जयंती कधी आणि कोणी सुरु केली, महामानवाचा स्मृतिगंध,  ग्रंथकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बुद्विवादाची प्रेरक शक्ती, शिक्षणाची मुहुर्तमेढ, शांततामय सहजीवनाचे हमीपत्र, महामानवाचा जीवनपट,  समतेचा उद्गाता, प्रेरणा, ऊर्जा आणि स्फूर्ती देणारी तीर्थस्थळे, सुरक्षेचा प्रहरी, नव्या संधी प्रगतीच्या आणि दलित साहित्याचा आधारवड आदी लेखांचा समावेश आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी हा विशेषांक खरेदी करावा, असे  आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी