वृक्ष लागवड मोहिमेकरीता सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक - पालकमंत्री मदन येरावार




  
यवतमाळ, दि. 27 : दिवसेंदिवस कमी होणा-या वनांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यवतमाळकरांना तर याची चांगलीच जाणीव आहे. आजची भीषण पाणी टंचाई ही त्याचीच परिणीती आहे. वनांचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य शासनाने यावर्षी 13 कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. मात्र हे केवळ एकट्या वनविभागाचे काम नाही. तर या मोहिमेच्या यशस्वीकरीता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
13 कोटी वृक्षलागवडीसंदर्भात नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सर्व यंत्रणांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, मुख्य वनसंरक्षक पी.जी. राहूरकर, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, अरविंद मुंढे, के.एम. अभर्णा उपस्थित होते.
राष्ट्रीय वन नितीनुसार पर्यावरणाचे संतूलन साधण्यासाठी 33 टक्के भुभागावर जंगल असणे आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, मानवाने नैसर्गिक संपत्ती नष्ट केली आहे. त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत. वृक्षांना सगे-सोयरे म्हणायची आपली संस्कृती आहे. तीन वर्षात राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात 50 कोटी वृक्षलागवडीचे ध्येय निश्चित केले आहे. त्यासाठी जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले आहे. यावर्षी 13 कोटी वृक्ष लागवडीत यवतमाळ जिल्ह्याला 59 लक्ष 17 हजार एवढे उद्दिष्ट आहे. गत दोन वर्षात प्रत्येक जिल्ह्यात वृक्षलागवड ही लोकचळवळ बनली आहे. जगण्यासाठी माणसाला रोज 15 कि.ग्रॅ ऑक्सीजनची आवश्यकता असते. त्यासाठी सात झाडे लावणे आवश्यक आहे.
गत दोन वर्षात 2 कोटी व 4 कोटी वृक्ष लागवड मोहीम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आली. नागरिकांकडून वृक्षांचे संगोपनसुध्दा करण्यात येत आहे. यावर्षीसुध्दा शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि लोकचळवळीतून हे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल. सर्व विभागाला उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे सर्व विभागाने त्याचे योग्य नियोजन करावे. नगर पालिका प्रशासनाने शहरी भागात झाडे वाचविण्याला प्राधान्य द्यावे. जिल्ह्यातील सर्व पालिका क्षेत्रातील शाळांच्या आवारात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गालयत तसेच इतरही मार्गांच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्याचे नियोजन करावे. विद्युत विभागाने 33 के.व्ही. सबस्टेशनच्या परिसरात तसेच रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करावी. वन विभागाव्यतिरिक्त जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, कृषी, सिंचन, शिक्षण आदी विभागांनी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त झाले लावावीत, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या. यावेळी हरीत सेनेचे सदस्य झाल्याबद्दल जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू व मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यात 2 लक्ष 18 हजार 59 हेक्टरवर वनक्षेत्र आहे. यावर्षी 60 लक्ष 3 हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट ठरवून नियोजन करण्यात येत आहे. त्याकरीता 114 रोपवाटिकांची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक पी.जी.गहूरकर यांनी केले. संचालन वनसंरक्षक प्रांजली दांडगे यांनी तर आभार आर.व्ही. गोपाळ यांनी केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.    
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी