गरोदर मातांना बुडीत मजुरीची रक्कम तात्काळ मिळण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करावी - जिल्हाधिकारी अमोल येडगे


 


मानव विकास कार्यक्रमाचा आढावा

 

Ø  गरोदर मातांच्या तपासण्या वेळेवर व्हाव्या

Ø  तपासणीला ने-आण करण्यासाठी वाहन उपलब्ध करावे

Ø  उपजिल्हा रूग्णालयातील सोनोग्राफी मशीन तात्काळ सुरू करावी

Ø  डोंगराळ व अतिदुर्गम भागातील गरजू मुलींना सायकल वाटपात प्राधाण्य द्या

Ø  उमेदमार्फत मोठी गोदामे व प्रक्रिया केंद्राची उभारणी करावी

 

यवतमाळ, दि 24 मे, जिमाका :-  अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील बाळांत महिलांना प्रसुतीपुर्व व प्रसूतीनंतर अशा दोन टप्प्यात एकूण चार हजार रुपये बुडीत मजूरी देण्याची योजना मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र गरोदर मातांना बुडित मजूरीची रकम तात्काळ मिळावी यासाठी लाभार्थ्यांचा डाटा संकलीत करून त्यांच्या खात्यात थेट रकम देण्यासाठी संगणक प्रणाली विकसीत करून प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता अधिक सुदृढ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

मानव विकास कार्यक्रमाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी काल महसूल सभागृह येथे घेतला. याप्रसंगी मानव विकासचे जिल्हा नियोजन अधिकारी अ.वि. सुने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा विज्ञान अधिकारी राजेश देवते, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण, शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री राऊत, उमेदचे निरज नखाते, माविमचे रंजन वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी सर्व गरोदर लाभार्थींना वेळेवर लाभ दिला जातो का, विहित कालावधीत त्यांच्या आरोग्य तपासण्या होतात का, याबाबत विचारणा करून आरोग्य शिबीरात जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नियमित भेट देवून पाहणी करण्याचे व त्यांचे स्तरावर योजनेचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना दिल्या. गरोदर मातांच्या तपासण्या वेळेवर व्हाव्या व त्यांना तपासणीसाठी अडचण येवू नये यासाठी त्यांना ॲम्ब्युलन्स किंवा इतर वाहनातून तपासणी शिबीरात आणण्याचे नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले. पुसद व पांढरकवडा येथील उपजिल्हा रूग्णालयातील सोनोग्राफी मशीन तात्काळ सुरू करावी तसेच इतर उपजिल्हा रूग्णालयात नवीन सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

मानव विकास कार्यक्रमांतर्गत 8 वी ते  12 पर्यंतच्या गरजू मुलींना सायकलीचे वाटप करतांना डोंगराळ व अतिदुर्गम भागात व जिथे जाण्यासाठी सुयोग्य रस्ते नाही, वाहतुकीची व्यवस्था, साधन उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी राहणाऱ्या गरजू मुलींना प्राधाण्याने सायकली वाटप करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

उमेद मार्फत राबविण्यात येणाऱ्या मानव विकास योजनेतून लाभार्थ्यांना फायद्याची ठरतील अशी मोठी गोदामे व प्रक्रिया केंद्राची उभारणी स्वयंसहायता समुह, ग्रामसंघ, प्रभाग संघ किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या माध्यमातून करण्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी