गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी 14 कोटींची मदत तालुक्याला वितरीत



* शेतकऱ्यांना तातडीने वाटप करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
यवतमाळ, दि. 07 : गत महिन्यात जिल्ह्यात झालेल्या गारपीटमुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने सर्व्हे करून शासनाकडे अहवाल सादर केला. त्यानुसार जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून 14 कोटी 3 लक्ष 31 हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला 6 मार्च रोजी सायंकाळी प्राप्त झाला. हा निधी कालच तालुक्यांना वितरीत करण्यात आला आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना या निधीचे वाटप तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी तहसीलदारांना दिले आहे.
जिल्ह्यात 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. या गारपीटमुळे जिल्ह्यात एकूण 11 हजार 90 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यात 33 ते 50 टक्क्यापर्यंत 8 हजार 329 हेक्टर तर 50 टक्क्याच्या वर 2 हजार 761 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी महसूल व कृषी विभागाला बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. अहवाल प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाने सदर अहवाल शासनाकडे पाठविला. त्यानुसार जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून शासनाकडून 14 कोटी 3 लक्ष 31 हजार रूपये प्राप्त झाले. हा निधी तातडीने तालुक्यांना वर्ग करण्यात आला आहे.
यवतमाळ तालुक्यात एकूण 1 हजार 354 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 1 कोटी 83 लक्ष 19 हजार 815 रुपये, कळंब तालुक्यात एकूण 102 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 15 लक्ष 97 हजार 500 रुपये, राळेगाव तालुक्यात एकूण 126 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 17 लक्ष 3 हजार 700 रुपये, बाभुळगाव तालुक्यात एकूण 1 हजार 54 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 1 कोटी 43 लक्ष 81 हजार 55 रुपये, मारेगाव तालुक्यात एकूण 447 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 60 लक्ष 44 हजार 220 रुपये, केळापूर तालुक्यात एकूण 172 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 23 लक्ष 39 हजार 775 रुपये, घाटंजी तालुक्यात एकूण 782 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 64 लक्ष 51 हजार 240 रुपये, आर्णी तालुक्यात एकूण 1 हजार 354 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 1 कोटी 38 लक्ष 5 हजार 480 रुपये, दारव्हा तालुक्यात एकूण 2 हजार 730 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 3 कोटी 69 लक्ष 18 हजार 350 रुपये, नेर तालुक्यात एकूण 88 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 12 लक्ष 82 हजार 950 रुपये, पुसद तालुक्यात एकूण 1 हजार 436 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 1 कोटी 98 लक्ष 34 हजार 260 रुपये, उमरखेड तालुक्यात एकूण 900 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 1 कोटी 3 लक्ष 17 हजार 655 रुपये आणि महागाव तालुक्यात एकूण 540 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 73 लक्ष 35 हजार रुपये वितरीत करण्यात आले आहे.
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सदर निधीचे वाटप तातडीने करून तसा अहवाल तालुक्याने सात दिवसांच्या आत जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहे.
000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी