शेतक-यांचे आत्मबल वाढविणे हा कृषी महोत्सवाचा गाभा - पालकमंत्री मदन येरावार

                                              
v पोस्टल ग्राऊंड येथे पाच दिवसीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन




यवतमाळ, दि. 17 : शेती आणि शेतकरी हे सुरवातीपासूनच मानाचे बिंदू राहिले आहेत. उत्पादन निर्मितीचा आनंद देऊन जगाला पोसण्याचे शेती हे एक तंत्रज्ञान आहे. शेतक-यांना शेतीबाबत नवीन माहिती, नवीन तंत्रज्ञान, विविध पीक पध्दती याविषयी माहिती व्हावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव घेण्याची संकल्पना समोर आली. त्यासाठी गतवर्षीपासून विशेष निधीची तरतूदसुध्दा करण्यात आली आहे. ख-या अर्थाने शेतक-यांचे मनोबल वाढविणे, हा कृषी महोत्सवाचा गाभा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने आयोजित पाच दिवसीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय राठोड, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, दारव्हाचे नगराध्यक्ष बबन इरवे, कृषी संशोधन केंद्राचे डॉ. प्रमोद यादगिरवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय काळे, कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे आदी उपस्थित होते.
कृषी हा अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे यावर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी 63 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यात 9 लक्ष 35 हजार हेक्टर जमीन पीक लागवडीखाली आहे. शेतकरी सन्मानाने जगला पाहिजे, समृध्द झाला पाहिजे, यासाठी शासनाचे प्रयत्न आहे. आजही 50 ते 60 टक्के रोजगार कृषीवर आधारीत आहेत. दुष्काळ, नापिकी, गारपीट अशी अनेक संकटे आली तरी सरकार शेतक-यांच्या मागे ठामपणे उभे आहे. शेतीमध्ये गुंतवणूक वाढणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील अर्धवट सिंचन प्रकल्पासाठी बळीराजा जलसंजीवनी योजना आणली. या अंतर्गत जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पासाठी 700 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कालव्याचे पाणी टेलपर्यंत पोहचण्यासाठी 132 कोटी निधी दिला आहे. आपल्या जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजना उत्कृष्टपणे राबविली जात आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अभिनंदन. दोन-तीन शेतकरी मिळून दोन, पाच किंवा सात मेगॅवाटचे ट्रान्सफार्मर देण्याची योजना आहे. धडक सिंचन विहिरीसुध्दा मर्यादीत वेळेत पूर्ण करून 24 तासात शेतक-याला वीज जोडणी देण्यात येणार आहे.
कृषी क्षेत्रात आजच्या परिस्थितीत नवीन तंत्रज्ञान येत असल्यामुळे आधुनिकतेची कास धरणे गरजेचे आहे. शेतीला जोडधंदे, पुरक व्यवसाय, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी नानाजी देशमुख योजना, ठराविक अंतरावर हवामान आधारीत यंत्र यासाठी इस्त्रालयच्या कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. मोअर क्रॉप…पर ड्रॉप हे शासनाचे उद्दिष्ट आहे. आधार लिंक, थंब इंप्रेशन, ऑनलाईन अर्ज भरून शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरला आहे. विशेष म्हणजे या कर्जमाफीत जमिनीची कोणतीही अट शासनाने ठेवली नाही. वंचित राहिलेल्या सर्वांना कर्जमाफी देण्याचे शासनाचे धोरण आहे. यवतमाळ हा कापूस आणि सोयाबीन उत्पादक असल्यामुळे येथे टेक्सटाईल पार्क तयार करण्यात येत आहे. सावता माळी बाजारपेठ योजनेंतर्गत शेतक-याला आपला शेतमाल कोणत्याही बाजार समितीत विकता येणार आहे. पेरणीच्या वेळी खत, बियाणे आदी शेतात नेण्यासाठी व उत्पादीत झालेला शेतमाल सुरक्षित ने-आण करण्यासाठी पांदन रस्ते मोकळे करण्यात येत आहे. बाजार समितीमध्ये असलेल्या शेतमाल तारण योजनेचा शेतक-यांनी लाभ घ्यावा. तसेच या कृषी महोत्सवाला जिल्ह्यातील प्रत्येक शेतक-याने भेट द्यावी. येथे विविध विषयांवर शास्त्रज्ञांकडून होणा-या मार्गदर्शनाचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
यावेळी सहपालकमंत्री संजय राठोड म्हणाले, या महोत्सवात शेतक-यांसाठी वेगवेगळे परिसंवाद, व्याख्याने, विचारांची देवाणघेवाण, समस्यांचे निराकरण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. बदलणा-या तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात क्रांती झाली आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतक-यांनी आत्मसाद करावे. विदर्भ, व-हाड हा शेतीसंपन्न भाग आहे. मात्र यावेळी पाऊस कमी झाल्याने सर्व नियोजन विस्कळीत झाले. त्यामुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नका. कृषी विभागाने शेतक-यांसाठी मनाने काम करावे. शेतक-याला समृध्द करण्यासाठी पाऊले उचलावी. कृषी विभागाचे विविध योजना शेतक-यांच्या बांध्यापर्यंत पोहचवा. हा महोत्सव शेतक-यांसाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.
तर कृषी आधारीत सरकारचा कार्यक्रम शेतक-यांपर्यंत पोहचविण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले. कर्जमाफीपासून कोणीही वंचित राहणार नाही. मागेल त्या प्रत्येक शेतक-याला नवीन कर्ज देण्यात येईल. शेतक-यांनी पीक नियोजन कसे करावे, यासाठी मोतिरामजी लहाने योजनेत क्लश्टर तयार करण्यात येईल. शेतकरी उत्पादक गटाला चालना देणे, गटशेतीसाठी शेतक-यांना मार्गदर्शन करणे आदी कामे कृषी विभागाने प्राधान्याने करावी, असे ते म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी विभागाच्या विविध योजनांच्या घडीपुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच प्रगतशील शेतकरी अंकूश बदमारे, सरेश पतंगराव, मनोरमा वानखेडे, देवराव ठावरी, प्रवीण गायकी, पांढरकवडा येथील आदर्श कृषक शेतकरी गट, बाभुळगाव येथील हिरकणी महिला बचत गट, पुसद येथील संत भक्तीपुरुष बचत गट, डायमंड पोल्ट्री स्वयंसहायता बचत गट, स्वावलंबी हळद उत्पादक गट आणि कृषी संजीवनी प्रक्रिया उद्योग गट यांच्यासह कृषी सहायक के.व्ही. कामडी, एस.एस. भगत, पुरुषोत्तम ठाकरे, एन.व्ही. कांबळे आदींचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कृषी महोत्सव पाच दिवस चालणार असून वेगवेगळी दालने येथे लावण्यात आली आहेत. यात  विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल, निविष्ठा व सिंचनवर आधारीत स्टॉल, गृहपयोगी वस्तुंचा स्टॉल तसेच आत्मातर्फे विकसीत गट, बचत गट, उत्पादक शेतकरी माल, सेंद्रीय शेती व धान्य महोत्सवाचा यात समावेश आहे. या कृषी महोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय काळे यांनी केले. संचालन कैलास राऊत यांनी तर आभार कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे यांनी मानले. यावेळी कृषी व संलग्न विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध स्टॉलधारक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी