सोशल मिडीयाचा वापर सकारात्मक कामासाठी करा - अपर जिल्हाधिकारी जाजू


                   
                          
v जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सोशल मिडीया महामित्र उपक्रम
यवतमाळ, दि. 16 : सुरवातीच्या काळात माहिती मिळण्याचे पर्याय मर्यादीत होते. मात्र आजचे युग हे माहितीचे युग आहे. विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ज्ञानाचे भांडार उपलब्ध आहे. ही माहिती अनेक स्त्रोतांद्वारे आपण मिळवू शकतो. त्यातच सोशल मिडीया प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे चांगले समाजमन घडविण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर सकारात्मक पध्दतीने करा, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय आणि जि.प. उर्दु कन्या शाळेत घेण्यात आलेल्या सोशल मिडीया महामित्र उपक्रमात ते बोलत होते. यावेळी सहकारी संस्थेच्या सहनिबंधक अर्चना माळवे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, डॉ. नितीन खर्चे, जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने आदी उपस्थित होते.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे संपूर्ण राज्यात सोशल मिडीया महामित्र उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सदर उपक्रम घेण्यात आला. यावेळी बोलतांना अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू म्हणाले, शासनाचा हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे. उद्याचे भविष्य युवकांच्या हाती आहे. ही तरुण पिढी आज समाज माध्यमातून व्यक्त होत असते. त्यामुळे विधायक कार्य त्यांच्या माध्यमातून पोहचणे गरजेचे आहे. चांगले आणि वाईट अशा दोन्ही बाजू समाज माध्यमांवर सातत्याने निदर्शनास येतात. मात्र त्यातील चांगले जर आपण आत्मसात केले तर नकारात्मतेची बाजू कमी होण्यास मदत होईल. याबाबत आपण जागृत होणे गरजचे आहे. विधायक कार्याची सुरुवात स्वत:पासून करणे केव्हाही चांगले असते, असे ते म्हणाले.
सदर उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील यवतमाळ, दिग्रस, पुसद, उमरखेड, राळेगाव, आर्णि आणि वणी या सात क्षेत्रातील गटचर्चा घेण्यात आली. परीक्षक व निरीक्षक म्हणून कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य सदानंद मनवर, प्रा. नीलेश भगत, ग्रंथपाल संघटनेचे विनोद देशपांडे, मनोज रणखांब, विवेक कवठेकर, अमोल भागडकर, हरिशचंद्र राठोड, ॲड. हरीश शर्मा, दाते डी.एड. कॉलेजचे प्राचार्य श्रीकांत पर्बत, प्रा. राजेश चव्हाण, ॲड. गोपाल पुरोहित, जगदीश भगत, देवेश मजेठिया, हेमंत कुळकर्णी यांनी काम पाहिले. गटचर्चेत सहभाग घेणा-यांना महाराष्ट्र वार्षिकीचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन अमोल भागडकर यांनी केले. यावेळी दिनेश करलुके, किरण जवके, सुरज भाकरे, हरिदास शेंडे आदी उपस्थित होते.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी