पाणी टंचाई निवारणासाठी सर्वांनी सहकार्य करावे - पालकमंत्री मदन येरावार

                                
v जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक

            यवतमाळ, दि. 10 : पाणी टंचाईच्या परिस्थितीत नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे, याला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी शासनस्तरावर निधीची कमतरता येणार नाही. या कठीण काळात योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. जनतेला पाणी मिळण्यासाठी जे काही करता येईल, ते प्राधान्याने केले जाईल. त्यासाठी शासन-प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाईबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा कांचन चौधरी, खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, नगर पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, न.प. मुख्याधिकारी अनिल अढागळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय बेले, उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे आदी उपस्थित होते.
            भविष्यात पाणीटंचाईच्या झळा बसू नये म्हणून अमृत योजनेला मान्यता मिळाली आहे, असे सांगून  पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, यावर्षीची पाणी टंचाई लक्षात घेता या योजनेच्या कामाला गती देण्यात आली आहे. याअंतर्गत 62.5 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला देण्यात आला आहे. एकमेकांच्या सहकार्याने पाणी टंचाईवर मात करणे शक्य आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नगर पालिकेने सेक्टर / झोन करून पाणी देण्याचे योग्य नियोजन करावे. काही भागात पाण्याचा अपव्यय होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, त्यावर तातडीने नियंत्रण आणा. शहरात सर्व भागात समतोल पाणी पुरवठा करण्यासाठी व्हॉल्व सुरू - बंद करणा-या कर्मचा-यांची तातडीने बैठक घ्यावी व त्यांना योग्य सुचना द्याव्यात.
            औद्योगिक परिसरासाठी असलेल्या गोकी जलाशयाचे पाणी टँकरने किंवा पाईपलाईनने आणणे शक्य आहे का, याबाबत आढावा घ्यावा. या काळात नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी टंचाई निवारण कक्ष उभारावा. वन विभागाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला सहकार्य करून पाणी पुरवठ्याबाबतची कामे त्वरीत निकाली काढावी. पालिकेने शहरातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत त्वरीत सुरू करावे. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या सार्वजनिक वापराच्या विहिरी स्वच्छतेमध्ये प्राधान्याने घ्याव्यात. तसेच विहिरींचे खोलीकरण, स्वच्छता झाल्यानंतर पिण्यायोग्य पाणी आहे, असा फलक प्रत्येक विहिरींवर लावावा. पालिकेच्या टँकरला कोणत्याही वॉर्डातून तसेच कोणत्याही विहिरींवरून पाणी भरू देण्यासाठी लोकप्रतिनिधींसुध्दा सहकार्य करावे. या टंचाईच्या काळात पालिकेने 5-10 अतिरिक्त टँकर ठेवावे. तसेच सार्वजनिक वापरासाठी इतर विभागाच्या हद्दीत असलेल्या विहिरी जिल्हा प्रशासनाने त्वरीत अधिग्रहीत कराव्यात. लोकांना टंचाई जाणवणार नाही, याबाबत लोकप्रतिनिधींनी नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
            जीवन प्राधिकरणने फ्लोटींग पंप बसविण्याच्या कामास सुरुवात केली आहे. निळोणा धरणात पाईपलाईन टाकण्यासंदर्भात निविदा मागविण्यात आली आहे. तसेच चापडोह धरणात पाईपलाईन टाकण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. गोकी प्रकल्पातून पाणी आणू शकतो का, याचा सर्वे करण्यात येत आहे. जीवन प्राधिकरणतर्फे ज्या भागात पाणी पुरवठा करण्यात येईल, तेथील नागरिकांना यासंदर्भात ऑटो फिरवून माहिती देण्यात येणार आहे. तसेच याबाबत नगरसेवकांनासुध्दा अवगत करण्यात येईल, या उपाययोजनांबाबत कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी माहिती दिली. यावेळी पालिकेच्यावतीने करण्यात येणा-या उपाययोजना मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी सांगितल्या.
            बैठकीला नगर पालिकेचे सभापती, नगरसेवक, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी