‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत 11 लक्ष घनमीटर गाळाचा उपसा




v पाच हजार हेक्टर शेतजमिनीवर टाकला गाळ
v शेतक-यांचे उत्पन्न वाढण्यास मदत
यवतमाळ, दि.5 : शासनाच्या ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 101 लघु व मध्यम प्रकल्पातून अंदाजित 11 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. धरणातून काढण्यात आलेला हा गाळ 2 हजार 54 शेतक-यांनी 5 हजार हेक्टरवर शेतजमिनीवर टाकल्याने शेतक-यांचे उत्पन्न वाढीस मदत होईल.
जिल्हयात असलेल्या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचून साठवण क्षमतेत घट झाली होती. त्यातच मागील वर्षी जिल्हयात अत्यल्प झालेल्या पावसामुळे धरणामध्ये अत्यंत कमी पाणीसाठा होता. बहुतांश धरणे जानेवारी – फेब्रुवारी पासून कोरडी होण्यास सुरूवात झाली. यावर्षीच्या पावसाळ्यात या धरणांमध्ये जास्तीत जास्त पाणी साठविल्यास त्याचा फायदा पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीलासुध्दा होईल, या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेला गती दिली. यासंदर्भात जिल्हाधिका-यांनी जलसंधारण विभाग व अशासकीय संस्थाच्या नियमित बैठका घेतल्या.
जिल्हयामध्ये एकूण 101 लघु व मध्यम प्रकल्प, पाझर तलाव आहेत. यातून अंदाजित 11 लक्ष घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला आला. गाळाचा लाभ 2 हजार 54 शेतक-यांनी घेतला. पाच हजार हेक्टरच्यावर हा गाळ शेतजमिनीमध्ये टाकण्यात आला. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमार्फत 8 धरणांमधील 2.40 लक्ष घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला आहे. ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत अशासकीय संस्थाचा सहभाग अत्यंत महत्वाचा ठरतो. यासाठी घाटंजी येथील ‘दिलासा’ या स्वयंसेवी संस्थेचा सहभाग घेण्यात आला. जिल्हयामध्ये विकासगंगा संस्था व त्याचे सहभागी नवविद्या, अस्मिता, रूक्मिणी, जनहित, समर्पण, अनिकेत या संस्थांनी मिळून 49 धरणांमधून अंदाजित 5 लक्ष घनमीटर एवढा गाळ काढण्याचे काम केले आहे. याशिवाय अनुलोम संस्थेनेसुध्दा मोलाची कामगिरी केली. शासनाच्या या योजनेअंतर्गत अशासकीय संस्था, पोकलेन मशीनचा पुरवठा नि:शुल्क करतात. त्याकरीता लागणारा डीझेलचा खर्च जलयुक्त शिवार योजनेच्या निधीमधून करण्यात येतो.
जिल्हयात गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार या योजनेला शेतक-याकडून उर्त्स्फुत सहभाग मिळाला. शेतात टाकलेल्या गाळामळे शेतजमिनीचा पोत सुधारून उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणा-या निळोणा व चापडोह यासह इतर तलावातील गाळ निघाल्यामुळे पाणीसाठ्यातसुद्धा वाढ होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व संबंधित यंत्रणा व अशासकीय संस्था यांचा योग्य समन्वय घडवून आणल्यामुळे ही योजना जिल्ह्यात यशस्वी झाली आहे.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी