वृक्ष संवर्धनासाठी ‘ऑक्सीजन पार्क’ येथे श्रमदान



Ø दर रविवारी होणार आयोजन
यवतमाळ, दि.8 : राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत यवतमाळ शहरातील ‘ऑक्सीजन पार्क’ येथे एकाच वेळी पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांच्या संवर्धनासाठी यवतमाळकर तसेच विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. याच संकल्पनेतून रविवारी ‘ऑक्सीजन पार्क’ येथे मोठ्या संख्येने नागरिकांनी श्रमदान केले.
जिल्हा प्रशासन व वनविभाग यांच्या प्रयत्नातून शहरालगत अमोलकचंद विधी महाविद्यालयासमोर 25 एकर परिसरात ‘ऑक्सीजन पार्क’ साकारण्यात आला आहे. ‘माझं यवतमाळ, माझं झाड’ या संकल्पनेनुसार 1 जुलै 2018 रोजी पालकमंत्री मदन येरावार यांच्या उपस्थितीत 13 कोटी वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. विविध संस्था, शाळा-महाविद्यालय आदींच्या प्रयत्नातून येथे एकाच वेळी पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षांच्या लागवडीसोबतच वृक्षांचे संवर्धन ही नागरिकांची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नागरिकांना केले.
त्यानुसार यवतमाळचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे यांनी विविध संघटना आणि नागरिकांच्या सहकार्याने ‘ऑक्सीजन पार्क’ येथे सकाळी 8 ते 10 या वेळेत श्रमदानाचे आयोजन केले. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गो ग्रीन संस्थेचे सदस्य, प्रयास संस्था, प्रतिसाद संस्था, कोब्रा ॲडव्हेंचर, बोधिसत्व फाऊंडेशन, टीडीआरएफचे सदस्य आदींनी येथे श्रमदान केले. या वृक्ष संवर्धनात वृक्षांना बांबुच्या काठीचा आधार देणे, झाडांना मातीचा थर देणे, झाडाभोवती आळे करणे आदी कामे करण्यात आली. अशाप्रकारचे श्रमदान दर रविवारी सकाळी 8 ते 10 या वेळत आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे यांनी केले आहे.
यावेळी सहायक वनसंरक्षक विठ्ठल राठोड, विभागीय वनअधिकारी प्रिया गुल्हाणे, श्री. गावंडे, श्री. सातपुते यांच्यासह विविध सामाजिक संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी