जगण्यासाठी धनापेक्षा वनसंपत्ती महत्वाची - पालकमंत्री मदन येरावार







v ऑक्सीजन पार्क येथे वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ
v एकाच वेळी नागरिकांनी लावली पाच हजार झाडे
यवतमाळ, दि. 30 : वाढते प्रदुषण, पर्यावरणाचा बिघडलेला असमतोल, ग्लोबल वॉर्मिंग आदी बाबी विचारात घेता आयुष्यात वनं मोठं की धन मोठं, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जगातील संपूर्ण संपत्ती गोळा केली तरी सहा महिन्यांचा ऑक्सीजन आपण विकत घेऊ शकत नाही. मात्र झाडे आपल्याला आयुष्यभर मोफत ऑक्सीजन देतात. त्यामुळे जगण्यासाठी धनापेक्षा वनसंपत्ती महत्वाची आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
शहरालगत वनविभागातर्फे साकारण्यात आलेल्या ऑक्सीजन पार्क येथे 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, खासदार भावना गवळी, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य वनसंरक्षक प्र.गं. राहूरकर, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, उपवनसंरक्षक रमेश कुमार, डॉ. भानुदास पिंगळे आदी उपस्थित होते.
वृक्ष लागवड या शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाला लोकसहभागामुळे लोकमान्यता मिळाली, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, एक झाड 50 वर्षात 35 लक्ष रुपये किमतीचे वायु प्रदुषण टाळते. 15 लक्ष रुपये किमतीचे ऑक्सीजन उत्पादन करते. 40 लक्ष रुपये किमतीचे पाण्याचे रिसायकलींग करते. एक झाड एका वर्षात तीन किलो कार्बन डॉयऑक्साईड नष्ट करते. एक परिपूर्ण झाड एक हजार माणसांचे जेवण शिजविण्यासाठी उपयोगी पडते. एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2 अंशाने कमी करते. एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगात येते. 18 लक्ष रुपये किमतीची जमिनीची धूप थांबविते. एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जगू शकतात. एक झाड आपल्या पालापाचोळ्यामुळे जमिनीचा कस वाढविते, असे झाडांचे महत्व पालकमंत्र्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवड मोहिमेतून एक नवीन लोकचळवळ राज्यातील प्रत्येक गावात, जिल्ह्यात रुजवली आहे. निसर्गाची जोपासना व पर्यावरण समतोलासाठी राष्ट्रीय वन धोरणानुसार 33 टक्के वन आवश्यक आहे. राज्यात हे प्रमाण 20 टक्‍क्यांच्या आसपास असून 13 टक्क्यांची कमतरता आपल्याला भरून काढायची आहे. वन विभागाने शुभेच्छा वृक्ष, स्मृती वृक्ष, माहेरची साडी, आनंदवृक्ष, प्रासंगिक आठवणींचे वृक्ष अशा अनेक नवीन संकल्पना अंमलात आणल्या. त्यासाठी वनविभागाचे अभिनंदन. निसर्गाने आपल्याला भरपूर मोफत दिले आहे, मात्र त्याची आपण किंमत केली नाही. त्यामुळे समस्यांची निर्मिती झाली. आता हे आव्हान स्वीकारून वृक्ष लागवडीचा व संवर्धनाचा उपक्रम यशस्वी करा. ऑक्सीजन पार्कचे शहरात सुंदर नियोजन करण्यात आले आहे. येथे नागरिकांसाठी आवश्यक बाबी पूर्ण करण्यात येतील. वृक्ष लागवडीचे नियोजन हे भविष्यासाठी असल्याने पृथ्वीला वाचविण्यासाठी तरुण-तरुणी, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांनी ग्रीन आर्मीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, दुष्काळ, पाणीटंचाई आपण प्रत्यक्ष अनुभवली आहे. यावर एकमेव उपाय केवळ वृक्ष लागवड आणि संवर्धन आहे. गत दोन वर्षात जिल्ह्याने वृक्ष लागवडीचे चांगले उद्दिष्ट गाठले. यावर्षी जिल्ह्यात 59.17 लक्ष उद्दिष्ट देण्यात आले आहे. प्रशासनाने पुढील वर्षाचेसुध्दा नियोजन केले असून त्यासाठी 1 कोटी 17 लक्ष रोपे उपलब्ध आहेत. हे झाड, हा ऑक्सीजन पार्क माझा आहे, अशी भावना ठेवावी. तसेच या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खासदार भावना गवळी आणि मुख्य वनसंरक्षक राहुरकर यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नोंदणी करण्यात आलेल्या नागरिकांची आणि सामाजिक संघटनांची नावे असलेल्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी थ्री मेथाडिस्ट इंग्लीश स्कूलचा विद्यार्थी बोधिसत्व खांडेराव याने ‘सीडबॉलचे’ महत्व उपस्थितांना सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे यांनी केले. संचालन प्रांजली दांडगे यांनी तर आभार कुशल रंगारी यांनी मानले. कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, तहसीलदार सचिन शेजाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांच्यासह टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, प्रतिसाद फाऊंडेशन, लोकनायक बापुजी अणे विद्यालय, अँग्लो हिंदी स्कूल, आबासाहेब पारवेकर महाविद्यालय, लॉयन्स क्लब, समता पर्व प्रतिष्ठाण अशा 44 विविध संघटनांचे प्रतिनिधी व 12 शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
00000000

Comments

  1. Save trees save life
    Great project Design and development by Yavatmal Forest Division. It's first time in state, 13 ha park design and developing within 7 days.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी