पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत चार रुग्णालयांचा नव्याने समावेश


v जिल्हयातील रूग्णांना दिलासा
v योजनेतील हॉस्पीटलची संख्या 13
यवतमाळ, दि. 30 : सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी राज्य शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील नऊ रुग्णालयांचा समावेश होता. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या पाठपुराव्यामुळे आता या योजनेत जिल्ह्यातील चार रुग्णालयांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी आग्रही असलेले पालकमंत्री मदन येरावार यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातील महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कॉटनसिटी मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटल अॅंड रिसर्च सेंटर, चिंतामणी हॉस्पीटल, संजीवन मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटल अॅंड रिसर्च इन्स्टीटयूट आणि श्री दत्त हार्ट हॉस्पीटल यांचा समावेश करण्यात आला आहे. या चार रुग्णालयाच्या समावेशमुळे सदर योजनेतील रुग्णालयांची संख्या 13 पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे जिल्हयातील गोरगरीब रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी सदर योजनेत वसंतराव नाईक शासकीय रूग्णालय, शांती ऑर्था हॉस्पीटल, तवाडे मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटल, साई श्रध्दा मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटल, क्रिटीकेअर हॉस्पीटल, मेडीकेअर हॉस्पीटल पुसद, लाईफ लाईन हॉस्पीटल पुसद, सुगम मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटल वणी, लोढा मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटल वणी यांचा समावेश आहे.
अधिकाधिक नागरिकांना सर्वात्तम व अत्याधुनिक वैदयकीय सेवेचा लाभ घेता यावा या करीता शासनातर्फे महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 971 शस्त्रक्रीया / औषधोपचार व 121 प्रकारच्या फेरतपासणी उपचारांचा लाभ रूग्णांना लाभ मिळतो. दारिद्रय रेषेखालील आणि दारिद्रय रेषेवरील (पांढरी शिधापत्रिकाधारक वगळता) पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा योजनेचे रेशनकार्ड व फक्त यवतमाळ जिल्हयासाठी शेतक-यांकडे कोणत्याही प्रकारचे रेशनकार्ड असल्यास त्याला महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटूंबाला दीड लाख रूपयांपर्यंत उपचारांचे वार्षिक संरक्षण मिळते. या योजनेअंतर्गत उपचारासाठी भरती झालेल्या रूग्णास दोन वेळचे जेवण, परतीचे प्रवासभाडे, 10 दिवस मोफत औषधी उपलब्ध करून देण्यात येते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत एकाच वेळी जिल्हयातील चार रुग्णालयाचा समावेश झाल्यामुळे जिल्हयातील हजारो गोरगरीब रूग्णांना दिलासा मिळाला आहे.
                                                 00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी