महाराष्ट्रदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण





यवतमाळ, दि. 2 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त पोस्टल ग्राऊंड येथे मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते.
       महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, स्वातंत्र्यानंतर राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसींनुसार वेगवेगळ्या घटक राज्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेने वेग घेतला.  याच अनुषंगाने 1 मे 1960 या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. यासाठी मोठा लढा उभा करावा लागला. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले.
हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या या राज्याने स्थापनेपासून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण देशात महाराष्ट्र हे आर्थिक संपन्न आणि प्रगत राष्ट्र म्हणून ओळखले जाते. प्रगतीचे आणखी टप्पे आपण भविष्यातही सर्वांच्या सहकार्याने पार पाडू, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
            तत्पूर्वी पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी पथसंचालनाची पाहणी केली. कार्यक्रमाचे संचालन चंद्रबोधी घायवटे आणि ललिता जतकर यांनी केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी सैनिक, शेतकरी, लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडीयाचे प्रतिनिधी इतर मान्यवर उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी