वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन काळजीपूर्वक करा - विभागीय आयुक्त पियुष सिंह





v जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, वॉटर कप आदी विषयांचा आढावा
यवतमाळ, दि. 10 : पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी गत चार वर्षांपासून शासनाच्या वतीने वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेत शासकीय यंत्रणेसोबतच सामाजिक संघटना व नागरिकांनी भाग घेऊन सर्वांनी झाडांचे काळजीपूर्वक संवर्धन करावे, असे प्रतिपादन अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सहाय्यक जिल्हाधिकारी भुवनेश्वरी, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते.
शासनाच्यावतीने चार वर्षात राज्यात एकूण 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे सांगून विभागीय आयुक्त पियुष सिंह म्हणाले, यावर्षीच्या 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेमध्ये यवतमाळ जिल्ह्याला 137.11 लाखांचे उद्दिष्ट आहे. वन विभागासोबतच इतर शासकीय यंत्रणांनी यात सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. इतर विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी पुढील सात दिवसांत जागा निश्चित करून खड्डे खोदण्यास सुरवात करावी. तसेच याची माहिती नियमितपणे पोर्टलवर अपलोड करावी. या बाबींचा विभागीय स्तरावर नियमित आढावा घेतला जाईल. वृक्ष लागवडीनंतर वृक्ष जगविणे हेसुध्दा आपले काम आहे. त्यामुळे याबाबत गांभिर्य ठेवा.
औद्योगिक विकास महामंडळांतर्गत असलेल्या प्रत्येक उद्योगामध्ये 33 टक्के वृक्षांची लागवड होणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हा उद्योग केंद्राने नियोजन करावे. तसेच आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची हरीत सेनेमध्ये नाव नोंदणी करावी. वृक्षलागवड मोहिमेकरीता लागणारी रोपे सामाजिक वनीकरण व वन विभागाने उपलब्ध करून द्यावी, अशा सुचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.
यवतमाळ जिल्ह्याला एकूण 137.11 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून यात वनविभाग 78 लक्ष 47 हजार, जिल्ह्यातील ग्रामपंचायती 38 लक्ष 44 हजार 400 आणि इतर विभागामिळून 20 लक्ष 20 हजार 450 उद्दिष्ट आहे. यासाठी 109 रोपवाटिकामध्ये 138.68 लक्ष रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.
जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेतांना विभागीय आयुक्त म्हणाले, जिल्ह्यात गतवर्षी जलयुक्तची कामे चांगल्या पध्दतीने करण्यात आली. त्यामुळेच क्रमवारीत जिल्ह्याचा आलेख वाढला. हा आलेख यावर्षीसुध्दा चढता राहील, यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे. सन 2018-19 मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत एकूण 375 गावांची निवड करण्यात आली आहे. यात एकूण प्रस्तावित कामांची संख्या 9059 असून 7057 कामे पूर्ण झाली आहेत. 100 टक्के काम पूर्ण झालेल्या गावांची संख्या 225 असून एक संरक्षित पाणी अंतर्गत निर्माण झालेली सिंचन क्षमता 13 हजार 191 हेक्टर आहे.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत 28 कामे सुरू असून आतापर्यंत दोन लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तसेच सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये सहा तालुक्यातील 298 गावे सहभागी झाली आहेत. कळंब तालुक्यातील तासलोट या गावात केवळ 21 कुटुंब असून 86 लोकसंख्या आहे. या गावात आतापर्यंत चार हजार घनमीटरचे श्रमदान करण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
बैठकीला उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, स्वप्नील कापडनीस, इब्राहिम चौधरी, व्यंकट राठोड, स्नेहा उबाळे, डॉ. शरद जावळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी