खरीप हंगामासाठी बियाणे व खते वेळेवर उपलब्ध करून द्या





v पालकमंत्र्यांच्या कृषी विभागाला सुचना
v खरीपासाठी 9 लक्ष 10 हजार हेक्टरवर नियोजन
यवतमाळ, दि. 20 : यवतमाळ जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर आधारीत आहे. निसर्ग, पाणी आदी गोष्टी आपल्या हाती नसल्या तरी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यावर कृषी विभागाचा भर असला पाहिजे. खरीप हंगामाला सुरवात होत आहे. त्यामुळे शेतक-यांना वेळेवर दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने तात्काळ करावे, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार ख्वाजा बेग, आमदार मनोहर नाईक, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.
कृषी विभाग हा गावस्तरावरील शेतक-यांपर्यंत पोहचणारा घटक आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, कृषी विभागाच्या योजना केवळ कागदावर ठेवू नका. शेतक-यांना हंगामात बियाणे व खतांची कमतरता जाणवणार नाही, याची काळजी घ्या. माती परिक्षणासंदर्भात जमिनीचा पोत पाहून शेतक-यांना मार्गदर्शन करा. जलयुक्त शिवार, धडक सिंचन, शेततळ्यांमुळे शेतक-यांना लाभ झाला आहे. या गोष्टींमध्ये सातत्य ठेवण्यासाठी कृषी विभागाने अधिक जोमाने काम करावे. पीक विमा योजनेत सर्व शेतक-यांना सहभागी करण्याचे प्रयत्न करा असेही ते म्हणाले. तसेच जि.प. आणि पंचायत समिती स्तरावर तक्रार नियंत्रण कक्ष उघडण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी विभागाच्या योजनांवर आधारीत घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रवीण जाधव आणि काशीराम राठोड यांना जमिनीची आरोग्यपत्रिका देण्यात आली.
जिल्ह्यात 2019-20 मध्ये 9 लक्ष 10 हजार 505 हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. यात सोयाबीन 2 लक्ष 77 हजार 842 हेक्टरवर, कापूस 4 लक्ष 58 हजार 856 हेक्टर, तूर 1 लक्ष 31 हजार 191 हेक्टर, ज्वारी 15 हजार 875 हेक्टर, उडीद 7034 हेक्टर, मूग 8668 हेक्टर, मका 220 हेक्टर आणि इतर पिके 10 हजार 819 हेक्टर यांचा समावेश आहे. जिल्ह्यात सोयाबीनची मागणी 1 लक्ष 56 हजार 286 क्विंटल असून आतापर्यंत 75 हजार क्विंटल उपलब्ध झाले आहे. तर कपाशीच्या 25 लक्ष 44 हजार 111 पॅकटची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी एकूण खतांची मागणी 1 लक्ष 90 हजार 707 मेट्रीक टन असून यापैकी आजघडीला 1 लक्ष 33 हजार 864 मेट्रीक टन खतांची उपलब्धता झाली आहे. यात युरिया, एमओपी, एसएसपी, कॉम्प्लेक्स, एनपीकेएस या खतांचा समावेश आहे.
०००००००
 



Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी