५० व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन *मानवी जीवनातील समस्यांवर उपाय काढू शकतो तो वैज्ञानिक! - जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रतिपादन

यवतमाळ, दि १६ फेब्रु, जिमाका:- विज्ञान संकुचित किंवा मर्यादित नाही. केवळ जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील प्रयोग म्हणजे विज्ञान नव्हे; तर वेगवेगळे रिसोर्सेस वापरून कमी खर्चात चांगले पर्याय उपलब्ध करून देणे आणि मानवी जीवन सुसह्य करणे हे विज्ञानाचे काम आहे. मानवाची बरीचशी कामे विज्ञान करू लागला आहे. आगामी काळात विविध ग्रहांवरही मानवी वस्ती दिसू शकेल. मानवी जीवनातील विविध समस्यांवर उपाय काढू शकतो, तोच खरा वैज्ञानिक होय, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद व राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या प्रांगणात जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि विशुद्ध संस्था द्वारा आयोजित ५० व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विनायक दाते यांच्या अध्यक्षतेत आज झालेल्या या सोहळ्याच्या मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी जयश्री राऊत, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी खुरपुडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, विशुद्ध संस्थेचे सचिव विजय कासलीकर, संचालक सुषमा दाते, उपशिक्षणाधिकारी डॉ. शिवानंद गुंडे, प्रदीप गोडे, विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. श्री येडगे पुढे म्हणाले, कोरोनानंतर प्रथमच यवतमाळात होत असलेले ५० वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन ही सर्वांच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि अभिमानाची गोष्ट आहे. सर्व प्रसिद्ध शास्त्रज्ञ कष्ट करून ग्रामीण भागातून पुढे आले. त्यांनी समाजासाठी काम केले. वैज्ञानिकांजवळ राष्ट्रभक्ती आणि समाजाप्रती आत्मीयता आवश्यक आहे. पुढच्या पिढितील वैज्ञानिकांनी आपल्या देशासाठी काम करावे. त्यासाठी शाळा महाविद्यालयातून स्पर्धा परीक्षेप्रमाणेच वैज्ञानिक संशोधनालाही चालना मिळायला हवी. तसेच या पिढितील वैज्ञानिकांना डिआरडीओ, इस्त्रो यासारख्या संशोधन संस्थांबाबत माहिती द्यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी सांगितले. डॉ. श्रीकृष्ण पांचाळ याप्रसंगी बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांत चिकित्सक वृत्ती मोठ्या प्रमाणात असते. या विद्यार्थ्यांना योग्य दिशानिर्देश देणे आवश्यक आहे. आजची पिढी खुप प्रज्ञावंत आहे. त्यांच्या गरजा ओळखून मार्गदर्शन केले पाहिजे. हे विज्ञान प्रदर्शन म्हणजे एक मेजवानीच आहे. यातुन वैज्ञानिकांची पुढची पिढी निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते म्हणाले, हे युग विज्ञानाचे आहे. यामुळेच आपण जगातली पाचवी अर्थव्यवस्था होऊ शकलो. यापुढे प्रगती करून तिसऱ्या स्थानापर्यंत झेप घेऊ. जागतिकीकरणाच्या या पार्श्वभूमीवर आयोजित हे संमेलन महत्त्वाचे आहे. ज्ञान घ्या, शिका आणि मोठे व्हा असा हितोपदेशही त्यांनी यावेळी केला. अतिथींनी आकाशात फुगे सोडून प्रदर्शनीचे उद्घाटन केले. तसेचा विज्ञान प्रदर्शनीत मांडण्यात आलेल्या विविध प्रयोगांची त्यांनी पाहणी करुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. राणी लक्ष्मीबाईच्या विद्यार्थिनींनी शारदास्तवन व स्वागत गीत सादर केले. विवेकानंदची विद्यार्थिनी भूमिका काटपेल्लीवारने कथक नृत्य सादर केले. ॲग्लो हिंदी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्किपिंग रोपची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी प्रास्ताविक करताना माध्यमिक शिक्षणाधिकारी जयश्री राऊत यांनी या पन्नासाव्या प्रदर्शनात १७६ प्रदर्शनीय प्रतिकृती असून यामुळे जिल्ह्यात वैज्ञानिक वातावरण तयार होण्यास मदत होईल असे सांगितले. याप्रसंगी विद्यार्थी वैज्ञानिक अनिकेत प्रशांत काकडे व अनुष्का बदुकले यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ४९ व्या जिल्हास्तरीय आभासी विज्ञान प्रदर्शनाचे तसेच इन्स्पायर अवार्ड आभासी प्रदर्शनाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. उपशिक्षणाधिकारी प्रदीप घोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन सविता अतकरे व नीता गावंडे यांनी केले. संमेलनाच्या प्रवेशद्वारानजीक विवेकानंद विद्यालयाचा विद्यार्थी हृषिकेश काकडे याने तयार केलेला सेल्फी पाॅइन्ट आकर्षण ठरला. याप्रसंगी विविध शाळांचे विज्ञान प्रतिकृती घेऊन आलेले विद्यार्थी, विज्ञान शिक्षक मुख्याध्यापक तसेच शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, मुख्याध्यापक संघ, विज्ञान अध्यापक, गणित अध्यापक मंडळ व विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, विवेकानंद व राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी तथा विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी