नागरिकांच्या तक्रारीवर समाधानकारक उत्तर नसल्यास सबंधित अधिका-यावर कारवाई- जिल्हाधिकारी

यवतमाळ दि 7 फेब्रु, जिमाका :- लोकशाही दिन, मुख्यमंत्री सचिवालय, किंवा मुख्यमंत्री लोकशाही दिनात प्राप्त तक्रारीवर अनुपालन सादर करताना ते गुणवत्तापूर्ण व समाधानकारक आहेत याची कार्यालय प्रमुखांनी खात्री करावी. अनुपालन समाधानकारक आहे किंवा नाही हे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तपासले जाईल. उत्तर योग्य नसल्यास त्याची नोंद संबंधित विभाग प्रमुखाच्या गोपनिय अहवालात घेतली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिला. जिल्हा लोकशाही दिन आणि मुख्यमंत्री लोकशाही दिनात प्राप्त तक्रारीवर त्यांनी विभाग प्रमुखांचे ऑनलाईन बैठकी घेतली. यावेळी ते बोलत होते. लोकशाही दिनात आलेल्या तक्रारीवर सात दिवसात कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच अर्जदाराला वेळेत कळवण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांची आहे. त्याचबरोबर जिल्हास्तरीय व सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी अभ्यागताना भेटण्याची वेळ ठरवून त्याची माहीती कार्यालयातील दर्शनी भागात लावावी. तसेच कार्यालयात अभ्यागत रजिस्टर ठेवावे. लोकांच्या कामाच्या तक्रार अर्जावर विहित कालावधीत कार्यवाही करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. लोकशाही दिनातील सर्व अर्ज यापुढे जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतील संबंधित विभागाच्या तक्रारी संदर्भात त्या - त्या विभागाचे अनुपालन प्राप्त होताच ते अनुपालन सुद्धा संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल. यामुळे नागरिकांना त्यांच्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली याची माहिती घरबसल्या पाहता येईल. जिल्ह्यातील सर्व कार्यालये प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कार्यालयात वापरण्यात येत असलेल्या प्लास्टिकची विल्हेवाट लावावी. तसेच प्रत्येक कार्यालयाने प्लास्टिकच्या एवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा. त्या कापडी पिशव्यांवर योजनांची माहिती द्यावी. यासोबतच तंबाखूमुक्त कार्यालय, अभिलेख कक्ष, सुंदर माझे कार्यालय, प्लास्टिकमुक्त कार्यालय या बाबींकडे कार्यालय प्रमुखांनी लक्ष द्यावे, असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. या बैठकिला निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार व-हाडे, सर्व तहसीलदार, सर्व विभाग प्रमुख, नगरपरिषद मुख्याधिकारी, पंचायत समिती गटविकास अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी