प्रथम वर्ष पॉलिटेक्निक डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

तंत्रशिक्षण संचालनालयाने दहावी नंतर प्रथम वर्ष इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत 25 जून आहे. ईच्छूक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र, महत्त्वाच्या तारखा तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने https://poly२४.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. जिल्ह्यात एक शासकीय व दोन खासगी तंत्रनिकेतन असून डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या एकूण 810 जागा उपलब्ध आहेत. एकूण प्रवेश क्षमतेच्या 70 टक्के जागा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता व 30 टक्के जागा इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता राखीव आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत. नोंदणी शुल्क अराखीव करीता 400 व राखीव करीता 300 रुपये आहे. ऑनलाइन पद्धतीमध्ये ई-स्क्रूटिनी, फिजीकल स्क्रूटिनी असे दोन पर्याय आहेत. फार्म भरण्यासाठी मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करावे लागतील. त्यानंतर ई-स्क्रूटिनी पद्धत निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुविधा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने पुर्ण करण्यात येईल. कागदपत्रांच्या पडताळणीत काही अडचण उद्भवल्यास, त्याची माहिती विद्यार्थ्याला एसएमएस प्रणालीतून देण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्याने लॉगईन करून त्रुटीची पूर्तता करून, पुन्हा अर्ज सबमिट करायचा आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष पडताळणी निवडलेल्या विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रांवर दिलेल्या वेळेत उपस्थित राहून, अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, पडताळणी करणे अशा बाबी करायच्या आहेत. विद्यार्थ्यांनी 25 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.आर.पी.मोगरे यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ आणि जिल्ह्यातल्या इतर तंत्रनिकेतन येथे प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक यवतमाळ ही भारतातील उद्योन्मुख पॉलिटेक्निक संस्थांपैकी एक आहे. संस्थेच्या पाच शाखेत एकून 300 जागा आहे. त्यात यंत्र अभियांत्रिकी 60 जागा, संगणक अभियांत्रिकी 60 जागा, अणुविद्युत अभियांत्रिकी 60 जागा, विद्युत अभियांत्रिकी 60 जागा व स्थापत्य अभियांत्रिकी 60 जागांचा समावेश आहे, असे संस्थेच्या प्राचार्यांनी कळविले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल