तंबाखू विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
तंबाखू व तंबाखूजन्यपदार्थ्यांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती करण्यासाठी जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी दि.31 मे रोजी साजरा केला जातो. त्यानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांपासून सामान्य नागरिक व देश सुरक्षित राहायला हवा. यावर्षी या दिवसाकरीता जागतिक आरोग्य संघटना यांनी तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्ष हे घोषवाक्य निवडले आहे. तंबाखू नियंत्रण समुदायाच्या प्रयत्नांमुळे सिगारेटचे प्रमाण गेल्या काही वर्षात कमी झाले असले तरी असुरक्षित गटांचे रक्षण करण्यासाठी आणखी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
त्याअनुषंगाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी पी.एस. चव्हाण आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगलपल्लेवार यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक तंबाखू नकार दिनानिमीत्त राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या चमुने महिनाभर विविध उपक्रमांमार्फत जनजागृती कार्यक्रम राबविले.
दि.1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व आरोग्य संस्थांमध्ये तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यात आली. कोटपा कायद्यांतर्गत दोन वेळा पोलिस विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग व आरोग्य विभागाच्या समन्वयाने धाडसत्र मोहिम राबविण्यात आली. विविध तंबाखू मुक्ती केंद्रांमध्ये तंबाखूचे सेवन करणाऱ्या लोकांचे समुपदेशन करण्यात आले. आकाशवाणीद्वारे जिल्हा शल्य चिकित्सकांनी तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत माहिती दिली.
तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या मौखिक रोगांविषयी विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. नगर परिषद घंटागाडीच्या माध्यमातून तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत ऑडिओ संदेश देण्यात आला. दि.31 मे रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. शासकीय जिल्हा परिचारीका महाविद्यालयामध्ये पोस्टर स्पर्धा आयोजित करुन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थिनींना पारितोषिके व प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला.
मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद यांच्या समन्वयाने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी तसेच अभ्यागतांसाठी स्वाक्षरी व संदेश मोहिम राबविण्यात आली आहे. जनजागृतीपर उपक्रमांचा समारोप तंबाखूमुक्तीची शपथ घेऊन करण्यात आला, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.
000
Comments
Post a Comment