ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

यवतमाळ, दि.20 (जिमाका) : इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेतंर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेले 150 विद्यार्थी, तृतीय वर्षात प्रवेश घेतलेले 150 विद्यार्थी व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेले 150 विद्यार्थी याप्रमाणे प्रती जिल्हा 450 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. प्रथम वर्षाची शैक्षणिक प्रवेश प्रकिया अद्याप सुरु नाही. त्यामुळे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया त्यांची महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यानंतर करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४३ हजार रुपये अनुज्ञेय राहील व तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ३८ हजार रुपये अनुज्ञेय राहणार आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेकरीता उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज दि.15 जुलै पर्यंत स्वीकारण्यात येतील व निवड यादी दि.1 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उच्च शिक्षणाच्या प्रथम वर्षासाठी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख दि.20 ऑगस्ट आहे तसेच निवड यादी दिनांक 2 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, यवतमाळ येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक मंगला मुन यांनी केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल