प्रलंबित कृषीपंप जोडणी 2019 पर्यंत पूर्ण करणार - पालकमंत्री मदन येरावार







v रुई-वाई येथे 33/11 केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण
यवतमाळ, दि. 17 : आजच्या काळात वीज ही अत्यंत आवश्यक मूलभूत गरज झाली आहे. देशातील एकही गाव विजेवीना राहणार नाही, हे पंतप्रधानांचे ध्येय आहे. गत चार वर्षांत मोठ्या प्रमाणात शेतक-यांना सिंचनाकरीता कृषीपंप वीज जोडणी देण्यात आली आहे. तरीसुध्दा काही प्रमाणात देणे बाकी आहे. मार्च 2018 पर्यंत प्रलंबित असलेले सर्व कृषीपंप वीज जोडणी 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
रुई-वाई येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत नवीन 33/11 केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण करतांना उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्या रेणू शिंदे होत्या. यावेळी मंचावर रुई-वाईच्या सरपंचा रुपाली राऊत, विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य प्रशांत दर्यापूरकर, मनोज मॅडमवार, अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, कार्यकारी अभियंता अंगाईतकर, संजय चितळे, बाळासाहेब शिंदे, संजय शिंदे आदी उपस्थित होते.
संपूर्ण राज्यात जवळपास सव्वादोन लाख कृषीपंपाचे कनेक्शन प्रलंबित आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, नियमित वीज देण्यासाठी ठिकठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती केली जात आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना प्रत्यक्ष फिल्डवर जाण्यासाठी सांगण्यात आले आहे. यामुळे कोणत्या भागात वीजेची आवश्यकता आहे, हे कळत असून त्यानुसार मागणी पूर्ण करण्यात येत आहे. राळेगाव येथे 132 केव्ही तर नेर येथे 220 केव्ही सब-स्टेशन करण्यात आले आहे. मांजर्डा येथील सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. यापूर्वी नियोजन समितीतून जिल्ह्याकरीता 25 कोटींचे ट्रान्सफार्मर घेण्यात आले. यासाठी अजून पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
विद्युत कंपनी ही नागरिकांना सेवा देणारी कंपनी आहे. चार वर्षांत नागरिकांना लोडशेडींगचा त्रास झाला नाही. भविष्यातही लोडशेडींग निर्माण होऊ देणार नाही. वीज निर्मिती, वितरण आदी बाबी खर्चिक असल्या तरी त्या पूर्ण करण्यावर आपला भर आहे. याशिवाय सौरउर्जा प्रकल्पसुध्दा कार्यान्वित करण्यात येत आहे. शेतक-यांच्या शेतात धडक सिंचन विहीर पूर्ण झाली की लगेच वीज कनेक्शन देण्याचे नियोजन आहे, असेही ते म्हणाले.
रुई वाई येथे 33 केव्ही उपकेंद्र 5 एमव्हीएचे रोहित्र दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती या योजनेतून कार्यान्वीत करण्यात आले आहे. या उपकेंद्राचे एकूण उभारणी मुल्य 3.94 कोटी रुपये आहे. या उपकेंद्रातून 11 केव्ही म्हसोला एजी, 11 केव्ही म्हसोला गावठाण व 11 केव्ही रुई वाई हे फिडर काढण्यात आले आहे. 11 केव्ही रुई - वाई फिडरवर रुई, वाई, बेलोरा व रामनगर तांडा ही गावे आहेत. आता नवीन उपकेंद्रामुळे तसेच फिरडची लांबी कमी झाल्यामुळे या गावांना योग्य दाबाचा वीज पुरवठा मिळत असून विज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.  
कार्याक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी तर संचालन प्रकाश कोळशे यांनी केले. यावेळी मनिष दुबे, संतोष काळे, नरेश दीक्षित, प्रवीण मुडे यांच्यासह विद्युत विभागाचे अधिकारी, परिसरातील गावांचे सरपंच आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी