ई-पॉस मशीनमुळे 40 हजार क्विंटल धान्याची बचत


v धान्य वितरणात आली  पारदर्शकता
यवतमाळ, दि. 15 : जिल्ह्यात राशन कार्ड संगणकीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. जवळपास 90 टक्के शिधापत्रिका ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. या संगणकीकरणामुळे धान्य वितरणात पारदर्शकता आली असून योग्य लाभार्थ्याला धान्य मिळत आहे. ई-पॉस मशीनच्या वापरामुळे तर लाभार्थ्यांना धान्य उचल करणे सोयीचे झाले असून आतापर्यंत 40 हजार क्विंटल धान्याची बचत झाली आहे.
जिल्ह्यात एकूण 6 लक्ष 69 हजार 542 शिधापत्रिकाधारक तर  28 लक्ष 50 हजार 609 सदस्य संख्या आहे. यात अंत्योदय योजनेतील कार्डधारकांची संख्या 1 लक्ष 30 हजार 451, प्राधान्य योजनेतील 2 लक्ष 90 हजार 381, एपीएल शेतकरी कार्डधारकांची संख्या 93 हजार 994, केशरी कार्डधारक 1 लक्ष 33 हजार 932 आणि शुभ्र कार्डधारकांची संख्या 20 हजार 784 आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 52 स्वस्त धान्याची दुकाने आहेत. योग्य लाभार्थ्याला धान्य मिळावे, याकरीता जिल्ह्यातील संपूर्ण स्वस्त धान्य दुकानात ई-पॉस मशीन लावण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात 2052 ई- पॉस मशिनद्वारे लाभार्थ्याना धान्य वितरण करण्यात येत आहे. ऑनलाईन धान्य वाटपाची ही टक्केवारी 87.23 आहे. जिल्ह्यात 8 हजार 48 मेट्रिक टन गहू आणि 5 हजार 582 मेट्रिक टन तांदूळ असे एका महिन्याचे  नियतन आहे. आधार संलग्नित सार्वजनिक वितरण प्रणालीमुळे 6 हजार 638 मेट्रीक टन गहू आणि 4 हजार 603 मेट्रीक टन तांदूळ वितरण केले जाते. त्यामुळे  प्रत्येक महिन्याला 1410   मेट्रिक टन गहू आणि 979 मेट्रिक टन तांदूळ असे एकूण 2389 मेट्रीक टन धान्याची बचत होत आहे. यानुसार मार्च 2018 पासून तर ऑक्टोबर अखेरपर्यंत एकूण 40 हजार 751 क्विंटल धान्याची बचत झाली आहे. बचत झालेल्या धान्याची किंमत 1 कोटी 98 लक्ष 46 हजार रुपये आहे. 
यामध्ये ई - पॉस मशीनवर शिधापत्रिकाधारक कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे आधार सिडिंग झाले असेल तरी धान्य वितरण करण्यात येते. शिधापत्रिकाधारक किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याचे आधार लिंकिंग करून घेण्यात आले आहे. त्यामुळे आता लाभार्थीच्या अंगठ्याचा ठसा पॉस मशीनवर घेऊनच धान्य वितरण होत आहे. त्याचा अंगठा आधीच्या माहितीशी जुळल्यावर त्याच्याकडील शिधापत्रिकेनुसार त्याला धान्य वितरण करण्यात येते. त्याची पावतीसुद्धा त्याला दिली जाते.
या सर्व पारदर्शक कारभारामुळे रेशन दुकानदाराकडे ऑनलाईन वितरण केलेले धान्य आणि महिना अखेर शिल्लक असलेले धान्य याची नोंद घेतली जाते. पुढील महिण्याचे नियतन देताना पूर्वीच्या महिन्यातील शिल्लक असलेले धान्य वजा करून दुकानदाराला धान्य मंजूर करण्यात येते. परिणामी धान्याची चोरी मोठ्या प्रमाणात थांबली आहे. या प्रकियेमुळे गरजू लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहचत असून शासनाच्या कोट्यावधी रुपयांची बचत होत आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी