वनहक्क पट्टयांपासून एकही आदिवासी वंचित राहणार नाही



v बिरसा पर्वामध्ये पालकमंत्र्यांचे प्रतिपादन
यवतमाळ, दि. 18 : जल, जंगल, जमीनचे खरे रक्षणकर्ते हे आदिवासी बांधव आहे. आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. वनहक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना वनहक्क पट्टे देण्यात येईल. एकही आदिवासी यापासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
पोस्टल ग्राऊंडवर आयोजित ‘बिरसा पर्व’ च्या दुस-या दिवशी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, माजी अध्यक्षा आरती फोफाटे, अनिल आडे, मिलिंद धुर्वे, विकास कुळसंगे, राजेंद्र मरसकोल्हे, पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, बिरसा पर्व आयोजन समितीचे अध्यक्ष राजू चांदेकर, पवन आत्राम आदी उपस्थित होते.
बिरसा मुंडा यांची जयंती शासनस्तरावर साजरी व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, 29 डिसेंबर 2017 रोजी शासनाने परिपत्रक काढून संत सेवालाल, संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, बिरसा मुंडा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती शासनस्तरावर साजरी करण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यानुसार 15 नोव्हेंबर रोजी शासकीय कार्यालयात बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात येते. बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुध्द भारतातील समाजाला एकत्रित केले. आजही आदिवासी समाज आपली संस्कृती टिकवून आहे. संस्कृतीमुळे समाजाचे एकत्रिकरण होत असते. गत दोन-तीन वर्षापासून आदिवासी बांधवाच्या एकत्रीकरणासाठी या बिरसा पर्वाचे आयोजन होत आहे. आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी अनेक कायदे आहे. पंडीत दिनदयाल जनवन योजनेच्या माध्यमातून तारेचे कुंपण, गॅस वाटप आदी योजना सरकार राबवित आहे. अर्थसंकल्पात आदिवासींसाठी राखीव निधी आहे. खर्च न झालेला निधी संपुष्टात येत नाही तर पुन्हा त्या योजनांवर वापरण्यात येतो. डीबीटीच्या माध्यमातून आदिवासींच्या खात्यावर थेट निधी जात आहे. या समाजातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च शासन करीत असून आदिवासी आश्रमशाळांव्यतिरिक्त ही मुले आता नामांकित शाळेत शिक्षण घेत आहे, असे त्यांनी सांगितले.
जल, जंगल, जमीन यांचा पेसामध्ये समावेश करण्यात आला आहे. जंगलाचे खरे रक्षण या समाजानेच केले. तेंदुपत्त्याच्या लिलावाकरीता विविध भागातील लोक यवतमाळ येथे येत असत. आजही आदिवासी समाजाच्या न्याय आणि हक्कासंदर्भात ज्या मागण्या असतील त्या पुर्ण करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. मुलभूत सोयीसुविधा आदिवासींच्या पोडावर निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
यावेळी बोलतांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा माधुरी आडे म्हणाल्या, बिरसा मुंडा यांनी इंग्रजाविरुध्द युध्द पुकारून आदिवासींच्या हक्कासाठी लढा दिला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपली स्वतंत्र फौज निर्माण केली. स्वर्गीय बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यापासून प्रेरणा घेऊन आपण समाजामध्ये आमुलाग्र बदल करू शकलो तरचं बिरसा पर्व यशस्वी झाले असे म्हणता येईल. या समाज परिवर्तनाच्या कार्यक्रमातून समाजाला निश्चित एक नवी दिशा दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी इतर मान्यवरांनीसुध्दा मार्गदर्शन केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद घोडाम यांनी तर संचालन विनोद डवले यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने आदीवासी बांधव उपस्थित होते.
०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी