जलयुक्त शिवार, शेततळे, रिचार्ज शाफ्टचा सकारात्मक परिणाम जिल्ह्याच्या भुजल पातळीत सरासरी अडीच मीटरने वाढ




यवतमाळ, दि. 13 : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे या महत्वाकांक्षी  योजनांसोबतच पाणी फाऊंडेशन आणि रिचार्ज शाफ्टमुळे जमिनीत पाणी मुरविण्यास यश आले आहे. विशेष म्हणजे यावर्षी 22 टक्के पर्जन्यमान कमी होऊनसुध्दा जिल्ह्याच्या भुजल पातळीत सरासरी अडीच मीटरने वाढ झाली आहे.
यवतमाळ जिल्हा हा समुद्र सपाटीपासून साधारणत: 450 मीटर उंचावर आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 911.34 मी.मी. आहे. उंचावर असल्यामुळे पावसाचे पडलेले पाणी खालच्या भागात वाहून जात होते. मात्र यावर्षी जिल्ह्यात जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली. पडलेला पाऊस जमिनीत मुरविण्यासाठी भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून रिचार्ज शाफ्ट करण्यात आले. तसेच सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गावांनी सहभाग नोंदवून श्रमदानाची कामे केली. या सर्वांचा सकारात्मक परिणाम होऊन जिल्ह्याची भुजल पातळी वाढण्यास मदत झाली.
गतवर्षी जिल्ह्यात  562.93 मी.मी (61.77 टक्के) पर्जन्यमान झाले. त्यामुळे जिल्ह्याची भुजल पातळी सरासरीपेक्षा अंदाजे तीन फूट खालावली होती. ऑक्टोबर 2017 मध्ये ही पातळी वजा 1.08 मीटर होती. यावर्षी जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमानाच्या 703.13 मी.मी. पाऊस झाला. तुलनेत हे पर्जन्यमान 22 टक्के कमी आहे. त्यातच 15 ऑगस्ट ते ऑक्टोबर अखेरपर्यंत म्हणजे जवळपास अडीच महिने पावसाचा खंड पडला. तरीसुध्दा ऑक्टोबर 2018 मध्ये भुजल पातळी 1.43 मीटर एवढी आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ सरासरी अडीच मीटरची आहे. भुजल पातळीत बाभुळगाव व कळंब हे दोन तालुके वगळता उर्वरीत तालुक्यात 0.84 ते 3.77 मीटरने वाढ झाल्याचे भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालात निदर्शनास आले आहे.
गत तीन वर्षात जिल्ह्यातील 373 गावांमध्ये एकूण 4032 रिजार्च शाफ्ट करण्यात आले आहे. यात 2015-16 मध्ये 155 गावांत 1568 रिचार्ज शाफ्ट, 2016-17 मध्ये 69 गावांत 592 आणि 2017-18 मध्ये 149 गावांत 1872 रिचार्ज शाफ्टचा समावेश आहे. रिचार्ज शाफ्ट अंतर्गत 30 मीटर खोल (जवळपास 100 फूट) बोअर करण्यात येत असून सभोवताली 8 घनमीटरचा खड्डा करण्यात येतो. बोअरमध्ये 12 ते 15 मीटरची केसिंग टाकून त्याला छिद्र करण्यात येते व ते लोखंडी किंवा नारळाच्या दोरीने बंद केले जाते. सभोवतालच्या खड्डयामध्ये बारीक वाळू, मध्यम आकाराचे दगड टाकले जातात. याला फिल्टर मिडीया किंवा गाळण खड्डा म्हणतात. याद्वारे पावसाचे पाणी गाळून बोअरमध्ये जाते. परिणामी जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते व बाष्पीभवन कमी होते. त्यामुळे पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होते.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात जलसंधारण व मृद संधारणाची कामे करण्यात आली आहे. यात नाला खोलीकरण, सिमेंट बांध, सलग समतल चर, दगडी बांध, गॅबीयन बंधारे, रिचार्ज शाफ्ट, बंधा-यांची दुरुस्ती, गाळ काढणे आदी कामांचा समावेश आहे. मागेल त्याला शेततळे अंतर्गत जिल्ह्यात 6701 शेततळ्यांची निर्मिती झाली आहे. तर सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 मध्ये जिल्ह्यातील 713 गावांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या नियमानुसार या गावांमध्ये 11 हजार शोष खड्डे, दोन लाख रोपांची निर्मिती झाली आहे. प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्हास्तर ते ग्रामस्तरापर्यंत भुजल पातळी वाढली आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी