तभाचे अनिरुध्द पांडे व एबीपीचे कपील श्यामकुंवर यांचा सत्कार



v जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन
यवतमाळ, दि. 16 : राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय व श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दै. तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी अनिरुध्द पांडे व एबीपी माझाचे प्रतिनिधी कपील श्यामकुंवर यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै. लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार न.मा.जोशी  तर प्रमुख अतिथी म्हणून दै. हितवादचे प्रतिनधी दिनेश गंधे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन भागवते, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते.
यावेळी ‘डिजीटल युगातील पत्रकारिता आचारनिती आणि आव्हान’ या विषयावर बोलतांना न.मा.जोशी म्हणाले, पत्रकारांसाठी आचारनिती असावी कि नसावी याची चर्चा 1966 पासून सुरू आहे. तसेच पत्रकारितेसमोरील आव्हानेसुध्दा कमी झाली नाहीत. बदलत्या काळानुरुप ती बदलत गेली. इंडियन प्रेस काऊंसिल स्थापन झाल्यानंतर त्याच्या कामाची अंमलबजावणी 16 नोव्हेंबरपासून करण्यात आली, त्यामुळे हा राष्ट्रीय प्रेस दिन म्हणून साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले. डिजीटल युगामुळे सर्वच क्षेत्राचा फायदा झाला आहे, असे सांगतांना दिनेश गंधे म्हणाले, ऑनलाईनला वृत्तपत्रात अनन्यसाधारण महत्व आले आहे. बातमीकरीता दुस-या दिवशीची वाट पहावी लागत नाही. ताबडतोब बातमी उपलब्ध होते. मात्र वाचकानेसुध्दा जागृत राहणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. तर पत्रकारांसाठी पेंशन, मजेठिया आयोग, पत्रकार संरक्षण कायदा आदी बाबी त्वरीत लागू कराव्यात, असे आवाहन नितीन भागवते यांनी केले.
सत्काराला उत्तर देतांना अनिरुध्द पांडे म्हणाले, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी या समितीवर मी आपला प्रतिनिधी म्हणून आहे. पत्रकारांना वैद्यकीय सहायता निधी देण्याचे काम ही समिती करते. यात एक लक्ष रुपयांपर्यंत मदतीची तरतूद आहे. पत्रकारांच्या पेंशन योजनेसंदर्भात या समितीच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी कपील श्यामकुंवर म्हणाले, पत्रकारांसाठी काम करणे गरजेचे आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या पत्रकारांच्या कुटुंबाकरीता निधी उभा केला पाहिजे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आपल्याला जाहीर झालेल्या पु.ल.देशपांडे राज्यस्तरीय वृत्तमालिका पुरस्काराची रक्कम आपण गरजू व्यक्तिच्या उपयोगासाठी देऊ. ज्या लोकांमुळे हा पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यांच्या कामासाठी ही रक्कम खर्च करण्यात येईल, असे कपील श्यामकुंवर यांनी जाहीर केले.
    तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते तरुण भारतचे अनिरुध्द पांडे आणि एबीपीचे कपील श्यामकुंवर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी