दुष्काळग्रस्त माळरानावर जलयुक्तमधून मत्स्यशेती




v गणेशवाडीमध्ये पाण्याच्या समृध्दीसोबतच शाश्वत उपजिविकेचे साधन
यवतमाळ, दि. 2 : पाणलोट क्षेत्राच्या माथ्यावर असलेल्या व काही प्रमाणात काळ्या बेसॉल्ट खडकाने आच्छादलेल्या गणेशवाडीला (ता.कळंब) नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागत होता. नागरिकांना पिण्याचे पाणी व जनावरांना चारापाण्याची सोय नसलेल्या गणेशवाडीमध्ये यावर्षी मात्र जलयुक्तच्या कामांमुळे पाण्याची समृध्दी आली आहे. गावक-यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला असून माळरानावर असलेल्या या गावात गावकरी गटाने मत्स्यशेती करीत आहेत.
गणेशवाडी हे गाव समुद्र सपाटीपासून 429 मीटर उंचीवर आहे. पिण्याच्या पाण्याच्या चार विहिरी, एक पॉवर पंप आणि सात हातपंप एवढे पाण्याचे स्त्रोत गावात उपलब्ध आहेत. मात्र माळरानावर असल्यामुळे पावसाचे संपूर्ण पाणी खालच्या भागात वाहून जात होते. त्यामुळे दरवर्षी गावात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत होते. गतवर्षी जिल्ह्यात सर्वात पहिला पिण्याच्या पाण्याचा टँकर नोव्हेंबरमध्ये गणेशवाडीतच लागला. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत गणेशवाडीमध्ये जलयुक्त शिवारची कामे हाती घेण्यात आली. कृषी, जलसंपदा, बेंबळा पाटबंधारे, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या विभागांच्या समन्वयातून जलयुक्त शिवार अंतर्गत मातीनाला बांध, डीप सीसीटी, सीएनबी दुरुस्ती, नाला खोलीकरण, रिचार्ज शॉफ्टची कामे करण्यात आली. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक 40 रिचार्ज शाफ्ट गणेशवाडीत करण्यात आले आहेत. सुरवातीला 16 रिचार्ज शाफ्ट तयार केल्यानंतर गावच्या मागणीनुसार अतिरिक्त 24 रिचार्ज शाफ्ट तयार करण्यात आले आहेत. जुन-जुलैमध्ये पडलेल्या पावसानंतर 15 ऑगस्ट पासून जवळपास अडीच महिने पावसाचा खंड पडला आहे. मात्र जलयुक्तच्या कामांमुळे गणेशवाडीतील पाणीपातळी आजही कायम आहे.  
गावातील नागरिकांना शेती व रोजमजुरी व्यतिरिक्त इतर उपजिविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, कृषी समृध्दी प्रकल्प (केम) आणि टाटा ट्रस्ट यांच्याद्वारे गावातील 32 नागरिकांना रोहू, कटला व मृगल असे तीन प्रजातींचे मस्त्यबीज वाटप करण्यात आले आहे. सुधाकर टेकाम, माधव मेश्राम, चंद्रभान वाडेकर, चंडकू मडावी आणि शंकर शिवणकर यांच्या नेतृत्वात मत्स्यशेतीकरीता पाच गट येथे कार्यरत आहेत. जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या जलसाठ्यात मत्स्यबीज सोडून मत्स्यशेतीला प्रारंभ झाला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक लाभार्थ्याला 500 याप्रमाणे एकूण 32 लाभार्थ्यांना 16 हजार मत्स्यबोटुकली देण्यात आली आहे.  गणेशवाडीत पहिल्यांदाच एवढ्या व्यापक प्रमाणात मत्स्यशेतीला सुरवात झाली असून शाश्वत उपजिविकेचे साधन गावक-यांना उपलब्ध झाले आहे.
विशेष म्हणजे मत्स्यशेती होणा-या जलसाठ्यात नाला खोलीकरणाची माती ढासळू नये म्हणून खस गवत लावण्यात आले आहे. माती पकडून ठेवण्यासोबतच या खस गवताचा दुहेरी फायदा आहे. यात निर्माण होणारे जीवजंतू हे माशांचे अन्न म्हणूनसुध्दा उपयोगात येते. तसेच भविष्यात खस गवतापासून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळू शकेल, असे नियोजन करण्यात आले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी