गोवर-रुबेला लसीकरण जनजागृतीकरीता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध उपक्रम



v पाच आठवडे चालणार मोहीम
v 9 महिने ते 15 वर्षांपर्यंत वयोगटातील सर्वांनी लसीकरण करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 16 : गोवर या रोगाचे निर्मुलन होण्याकरीता व रुबेला या रोगावर नियंत्रण मिळण्याकरीता नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. ही मोहीम पाच आठवडे चालणार असून या मोहिमेच्या जनजागृतीकरीता जिल्हा परिषदेच्या शाळांमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
यात रांगोळी स्पर्धा, हातावर मेहंदी काढून जनजागृती तसेच प्रभातफेरीच्या माध्यमातून संपूर्ण गावात लसीकरणाचा संदेश देणे आदींचा समावेश आहे. या मोहिमेत महागाव तालुक्यातील करंजी येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा येथे जनजागृतीबाबत नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गावच्या सरपंचा छाया व-हाडे, उपसरपंच मोतीराम राठोड, शाळा समिती अध्यक्ष राजेश हरकरे, शाळेतील शिक्षक मुक्ता धर्माळे, दिलीप व्यवहारे, शंकर आडे, केंद्रप्रमुख ए.जे. देशमुख आदी उपस्थित होते.
तसेच कायर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, महागाव येथील जिल्हा परिषद उच्च  प्राथमिक शाळा आणि दिग्रस येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक मराठी शाळा आदी ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गोवर-रुबेला लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली.
गोवर रोगाचे निर्मुलन 2020 पर्यंत करायचे असून रुबेला रोगावर नियंत्रण मिळवायचे आहे. भारतातील 21 राज्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत 9 महिने पूर्ण व 15 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील सर्व बालकांना गोवर-रुबेला लसीचा पहिला डोस देण्यात येईल. ही मोहीम सुमारे पाच आठवडे चालणार आहे. सुरवातीचे दोन आठवडे प्रत्येक शाळेत लाभार्थींना डोस देण्यात येईल. त्यानंतर दोन आठवडे शाळेत न जाणा-या लाभार्थ्यांना तर पाचव्या आठवड्यात राहिलेल्या सर्व लाभार्थ्यांना डोस देण्यात येणार आहे. या लसीचा कोणताही दुष्परिणाम नसून ही लस घेतल्यानंतर लाभार्थीचा गोवर व रुबेला या दोन्ही रोगापासून बचाव होणार आहे.
सर्व पालकांनी 9 महिने ते 15 वर्षांपर्यंतच्या आपल्या पाल्यांना ही लस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन तसेच शिक्षण विभागाने केले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी