कामगारांची नोंदणी आता ऑनलाईन - पालकमंत्री




बांधकाम कामगारांना निधी वाटप
यवतमाळ, दि. 1 : शासनाने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत राज्यात सर्वाधिक नोंदणी यवतमाळ जिल्ह्यात झाली आहे. 4 जुलै ते 4 ऑगस्ट 2018 या एका महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात 26 हजार कामगारांनी नोंदणी केली. ही मोहीम नियमितपणे सुरू आहे. कामगारांचा नोंदणी प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कामगारांच्या सर्व योजनांची माहिती घरपोच मिळण्यासाठी आता ही नोंदणी ऑनलाईन करण्याचे नियोजन आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
पोस्टल ग्राऊंड येथे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आवश्यक अवजारे खरेदी करण्यासाठी ‘गौरव श्रमाचा’ या कार्यक्रमांतर्गत निधी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. मंचावर जिल्हा कामगार अधिकारी राजदीप धुर्वे, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, न.प.बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती, संजय शिंदे, अमर दिनकर, विलास बावणे, राजू पडगीलवार आदी उपस्थित होते.
पृथ्वी ही कामगारांच्या हातावर उभी आहे, असे अण्णाभाऊ साठे यांनी म्हटले होते, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, कामगारांनी कष्टाने जग घडविले आहे. कामगारांच्या योगदानाशिवाय कोणतेही काम होत नाही. ‘श्रमेव जयते’ हा पंतप्रधानांचा नारा आहे. स्वातंत्र्यलढ्यात कामगारांचा मोठा सहभाग होता. जगप्रसिध्द अजिंठा-वेरूळच्या लेण्या दगडात बनविण्याकरीता कामगारांच्या 25 पिढ्यांनी काम केले आहे. ताजमहल हा सुध्दा कामगारांनी उभा केला आहे. मात्र बनविणा-याचे कोठेही नाव दिसत नाही. पर्यटक मात्र आपले नावे या पर्यटन स्थळांवर लिहून ठेवतात ही खेदाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले.
कामगारांचे दु:ख दूर करण्यासाठी कामगार कल्याण विभागाच्या योजना पोहचविण्याचे काम शासनाकडून सुरू आहे. कामागारांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, मुलीच्या लग्नाचा खर्च विविध योजनेंतर्गत सरकारने घेतला आहे. त्यांना विमा सुरक्षेचे कवच दिले आहे. कामासाठी बुट, हेल्मेट, हातमोजे, टॉर्च आदी साहित्य सरकारतर्फे देण्यात येत आहे. नोंदणी झालेला एकही कामगार निधीपासून वंचित राहणार नाही. कामगारांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, शासकीय विभाग तसेच नागरिकांनी नोंदणी करण्यासाठी कामगारांना प्रवृत्त करावे, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात अजय प्रधान, नामदेव करलुके, सुभाष ठाकरे, रामदास बोधडे, ज्ञानेश्वर कोसेकर, ललिता सुपे आदींना प्रतिकात्मक धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी संगणकाची कळ दाबून लाभार्थी कामगारांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कामगार अधिकारी राजदीप धुर्वे यांनी तर संचालन मंगला माळवी यांनी केले. यावेळी नगरसेवक-नगरसेविका, कामगार विभागाचे कर्मचारी, मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे सदस्य आणि मोठ्या संख्येने कामगार बांधव उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी