सरसकट मदतीशिवाय शेतकरी सावरू शकणार नाही - महसूल राज्यमंत्री संजय राठोड






                                                         
v दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी
यवतमाळ, दि. 02 : जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतमालांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतक-यांच्या तोंडचा घास हिरावला असून या संकटातून सावरण्यासाठी शेतक-यांना सरसकट मदतीची आवश्यकता आहे. त्याशिवाय तो सावरू शकत नाही. शेतक-यांना झालेल्या नुकसानीची सरसकट मदत मिळावी, यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.
दिग्रस, दारव्हा आणि नेर तालुक्यातील विविध गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करतांना ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, प्रभारी तहसीलदार संजय राठोड, तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव, पोलिस निरीक्षक श्री. आमले आदी उपस्थित होते.
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर, फळबागा या सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, असे सांगून महसूल राज्यमंत्री संजय राठोड म्हणाले, नुकसानीचा आकडा जवळपास 80 टक्के क्षेत्रावर आहे. त्यामुळे शेतक-यांना सरसकट मदत मिळावी, अशी भुमिका सरकारकडे मांडणार आहे. शेतक-यांचे हे नुकसान मोठे आहे. सरसकट मदतीशिवाय शेतकरी यातून सावरणार नाही, असेही ते म्हणाले. शासन शेतक-यांच्या पाठिशी आहे, त्यामुळे शेतक-यांनी घाबरू नये. मदतीकरीता तहसील व कृषी विभागाकडे शेतक-यांनी तात्काळ अर्ज सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संजय राठोड यांनी दिग्रस तालुक्यातील कलगाव येथे मोहम्मद फारुक मोहम्मद हारुन यांच्या शेतात कापसाची, अर्शद जलील यांच्या सोयाबीन पिकाची तर जमीर खाँ गुलाब खाँ यांच्या शेतातील संत्रा पिकाची पाहणी करून शेतक-यांचे सांत्वन केले. यानंतर त्यांनी आष्टा येथेही भेट देऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली व शेतक-यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. दारव्हा तालुक्यातील तरणोळी येथे किशोर कदम यांच्या शेतात सोयाबीनचा ठिग बघून त्यांनी नुकसानीचा अंदाज घेतला व शेतक-यांशी संवाद साधला. तसेच लोही येथील अनंत पेटकर, नेर तालुक्यातील सातेफळ येथे सचिन सोनवणे यांच्यासुध्दा शेतातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी संजय राठोड यांनी केली.  
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी