नुकसानग्रस्त कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही - आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके




                                                         
v अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी
यवतमाळ, दि. 03 : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतक-यांच्या शेतमालाला चांगलाच फटका बसला आहे. केवळ सोयाबीनच नाही तर कपाशी, तूर आदी पिकांचेसुध्दा नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईसाठी शासनाने दहा हजार कोटींची तरतूद केली आहे. शेतक-यांना दिलासा देण्यासाठी त्वरीत सर्व्हे करून अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहे. शासनाच्या मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.
बाभुळगाव तालुक्यातील वाटखेट, झपाटखेडा, कोटंबा आदी ठिकाणच्या नुकसानग्रस्त शेतांची त्यांनी पाहणी करून आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. अडचणीच्या या काळात पीक विम्याच्या रकमेपासून कोणीही सुटता कामा नये, असे सांगून आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके म्हणाले, सोयाबीनला तर फटका बसलाच आहे. याशिवाय परिसरातील कपाशी, तूर आदी पिकेसुध्दा हातची गेली आहेत. गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी सर्व्हे करतांना सर्व पिकांचा संयुक्त सर्व्हे करावा. काही ठिकाणी तलाठी केवळ सोयाबीनचेच नुकसान गृहीत धरत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तलाठ्यांनी नुकसान झालेल्या प्रत्येकच पिकांचा सर्व्हे करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
तालुक्यात अवकाळी पावसामुळे ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्या सर्व ठिकाणांचा सर्व्हे करून तसा अहवाल शासन स्तरावर पाठवावा.  याशिवाय शेतक-यांनी सर्व्हे क्रमांकासह इतर माहिती भरून नुकसानग्रस्त पिकांचा फोटो अपलोड करावा, असे आवाहन शासन स्तरावरून करण्यात आले आहे. शासकीय मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहता कामा नये, असे निर्देश डॉ. अशोक उईके यांनी संबंधित यंत्रणेला दिले. विरखेड येथे राजू उघडे यांच्या शेताची डॉ. उइके यांनी पाहणी केली. झालेल्या नुकसानीची शेतक-यांना सरसकट मदत मिळावी, अशी मागणी शेतक-यांच्यावतीने करण्यात आली.
यावेळी यवतमाळचे उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, राळेगावचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, बाभुळगावचे तहसीलदार आनंद देऊळगावकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, बाभुळगाव पंचायत समिती सभापती गौतम लांडगे, अविनाश दहेकर, मनोहर बुरेवार, प्रशांत मेघे, गजानन पांडे, मोहम्मद सलीम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात नुकसानीचा फटका 867 गावांना बसला आहे. यात बाधित शेतकरी संख्या 78 हजार 636 असून नुकसानग्रस्त क्षेत्र 95 हजार 439 हेक्टर आहे. यापैकी 31 हजार 825 हेक्टरवरील कापूस, 60 हजार 301 हेक्टरवरील सोयाबीन, 2084 हेक्टरवरील ज्वारी, 591 हेक्टरवरील तूर, 380 हेक्टरवरील हळद, 242 हेक्टरवरील भाजीपाला आदींचा समावेश आहे.


००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी