केंद्रीय पथकाने केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी







     यवतमाळ, दि. 22 : अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची पाहणी केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ.आर.पी.सिंग यांनी केली. नेर तालुक्यातील वटफळी, लोणी, मोझर, घारेफळ आणि सातेफळ येथील नुकसानग्रस्त सोयाबीन, कपाशी, मुग, उडीद आदी पिकांच्या नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आदी उपस्थित होते.
वटफळी येथील ओंकार खोब्रागडे यांच्या शेतातील सोयाबीनची गंजी, लोणी येथे श्री. बाफना यांच्या शेतातील नुकसानग्रस्त कपाशीचे बोंड, मोझर येथील राजेंद्र साखरकर, घारेफळ येथील अनिल खोडे यांच्या शेतातील नुकसानग्रस्त कपाशी, सोयाबीन आदींची त्यांनी पाहणी केली. तर सातेफळ येथे शेतकऱ्यांनी नुकसान झालेले सोयाबीन, कपाशी, मुग, उडीद आदी शेतमाल गावाच्या चौफुलीवर आणून त्याचे दुकान थाटले होते. या दुकानातील नुकसानग्रस्त शेतमालाची पाहणी करून केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.
सातेफळ येथे यशवंत देशमुख यांनी नुकसानग्रस्त मालाबद्दल डॉ.आर.पी. सिंग यांना माहिती दिली. अवकाळी व सततच्या पावसामुळे पूर्ण धान्य हातून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच लावलेला खर्चसुध्दा निघाला नाही व आता जे शेतात उभे पीक आहे तेसुध्दा पाण्यामुळे पूर्ण वाया गेले, असेही शेतकरी म्हणाले. शासनाने या पिकांची अवस्था पाहून जास्तीत जास्त मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना केंद्रीय पथकाचे डॉ.आर.पी.सिंग यांनी पाऊस कधी झाला, पेरणी कधी केली, गतवर्षी शेतमालाची काय अवस्था होती. उत्पन्न किती झाले होते आदीबाबत विचारपूस केली. मोझर येथील शेतकरी राजेंद्र सावरकर म्हणाले, 16 ऑक्टोबरपर्यंत सोयाबिनचे पीक शेतातून कापले होते. सर्वत्र पिकांची परिस्थिती चिंताजनक आहे. कपाशीचेसुध्दा 20 पैकी 12 बोंडे खराब निघत असल्याचे त्यांनी सांगितले.
या पीक पाहणी दौऱ्यावेळी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, दारव्हाचे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, उपविभागीय कृषी अधिकारी उदय काथोडे, नेरचे तहसिलदार अमोर पोवार, गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी