ग्राहक म्हणून चिकित्सक वृत्ती ठेवा – निवासी उपजिल्हाधिकारी



v ‘जागो  ग्राहक जागो’ अंतर्गत सदस्यांचे प्रशिक्षण
यवतमाळ दि.22 : भारत ही जगासाठी सर्वात मोठी व विश्वसनीय बाजारपेठ आहे. विकसनशील देशात अनेक बाबी विकण्यावर कंपन्यांचा जोर असतो. विविध प्रकारच्या जाहिरातींमधून आल्यावर उत्पादनांचा भडीमार सतत सुरू असतो. त्यामुळे ग्राहक म्हणून आपली फसवणून होणार नाही, यासाठी चिकित्सक वृत्ती जागृत ठेवा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी केले.
बचत भवन येथे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमार्फत ‘जागो ग्राहक जागो’ या मोहिमेअंतर्गत अशासकीय सदस्यांच्या प्रशिक्षणात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी शालीग्राम भराडी, सहाय्यक पुरवठा अधिकारी एकनाथ बिजवे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे हेमराज ठाकूर, नारायण मेहरे, हितेश सेठ, ॲङ अनुपमा दाते, वैधमापन शास्त्राचे सहाय्यक नियंत्रक श्री. ढाले, चंदू चांदोरे आदी उपस्थित होते.
दैनंदिन जीवनात आपण प्रत्येक जण ग्राहक आहोत, असे सांगून निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे म्हणाले, सेवा देतांना किंवा वस्तु खरेदी करतांना आपली ग्राहक म्हणून फसगत होण्याची शक्यता असते. यातून मार्ग कसा काढावा, कोठे तक्रार करावी, किती दिवसात करावी, याबाबत आपण अनभिज्ञ असतो. त्यामुळेच ग्राहक संदर्भातील सर्व कायद्यांची प्रभावीपणे जनजागृती होणे गरजेचे आहे. ग्राहकांसाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती आपल्याला असली की त्याचा व्यवहारीक जीवनात उपयोग होऊ शकतो. अशा प्रशिक्षणाच्या माध्यमातून हा उद्देश नक्कीच यशस्वी होईल. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांमार्फत प्रत्येक ग्राहकांपर्यंत जनजागृती केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ग्राहक संरक्षण कायद्यानुसार राज्य व जिल्हा मंचाचे कामकाज, न्यायदान प्रक्रियेत ग्राहकांना येणा-या अडचणींचे निराकरण, रेरा कायदा, अन्न सुरक्षा कायदा, ई-पॉस मशीन व संगणीकिकरण, भेसळबाबत किंवा वस्तुचा दर्जा ठरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळांची माहिती, वैधमापन शास्त्र यंत्रणेचे संगणीकीकरण, ग्राहकांचे विविध हक्क आदींबाबत माहिती देण्यात आली.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी शालिग्राम भराडी यांनी तर संचालन माधुरी नेवारे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी