घरफोडी करणारी कुख्यात आंतरराज्यीय टोळी जेरबंद



v स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
v 11 घरफोडीचे गुन्हे उघडकीस, 9 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
यवतमाळ, दि. 22 : भरदिवसा घरफोडी करणारी बुलढाणा जिल्ह्यातील आंतरराज्यीय टोळीला यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला असलेले 11 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी या टोळीकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. 
गेल्या काही दिवसांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात दिवसा घरफोडीच्या धाडसी चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलिस अधीक्षक मेघनादन राजकुमार यांनी सदर चोऱ्या तात्काळ उघडकीस आणण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक प्रदीप शिरस्कर यांना विशेष पथक स्थापन करण्याच्या सुचना दिल्या. घडफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा सुगावा लावण्याकरीता या पथकाद्वारे राज्यातील विविध जिल्ह्याचे अभिलेख पडताळण्याचे काम हाती घेण्यात आले. चोरी करणा-या गुन्हेगारांच्या हालचालीची माहिती घेत असतांनाच 15  ऑक्टोबर 2019 रोजी पुसद शहरातील शिवाजी नगर व श्रीनगर या भागात अवघ्या चार  तासामध्ये पाच बंद घरे फोडून दिवसा घरफोड्या झाल्या होत्या. त्यामुळे घरफोड्या करणा-या अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेण्याचे मोठे आवाहन पथकासमोर होते.
तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे चोरी करणारे आरोपी हे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील असल्याचे निष्पण्ण झाले. स्थानिक गुन्हे शाखेतील विशेष पथकाने चार ते पाच दिवसांपासून वेशांतर करून मेहकर येथे तळ ठोकला. गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गोपनीय माहितीच्या आधारे टोळी प्रमुख किशोर वायाळ, (रा. मेरा. ता. मेहकर, जि. बुलढाणा), आकाश प्रकाश पवार व राजू इंगळे (रा. बऱ्हाई ता. मेहकर जि. बुलढाणा) अशा तीन आरोपितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, महागाव, उमरखेड हद्दीत 11 ठिकाणी दिवसा घरफोड्या केल्याची कबुल दिली. सदर आरोपितांकडून गुन्ह्यात वापरलेली 1 कार, 2 मोटार सायकल, 97 ग्राम सोने व 550 ग्राम चांदी असा एकूण 8 लक्ष 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
कुख्यात किशोर वायाळ या आरोपीविरूध्द संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यात अंदाजे 150 वर गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने नमुद कुख्यात आरोपितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पुसद शहर पोलिस स्टेशन येथील दिवसा घरफोडीचे 8 गुन्हे, महागाव, वसंतनगर व उमरखेड येथील प्रत्येकी 1 असे घरफोडीचे एकूण 11 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक मेघनादन राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक नूरूल हसन, सहा. पोलिस अधीक्षक, पुसद येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक प्रदिप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, पोलिस हवालदार गोपाल वास्टर, मुत्रा आडे, पंकज पातुरकर, कविश पाळेकर, मो. ताज, दिगांबर पिलावण आदींनी पार पाडली.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी