वनराई बंधा-यांसाठी श्रमदान करा – जिल्हाधिकारी गुल्हाने





v बालकदिनी चिमुकल्यांसोबत बांधला बंधारा
यवतमाळ, दि. 14 : पावसाळ्यातील मान्सूनचा पाऊस व परतीच्या पावसामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील नदी-नाले वाहू लागले आहे. वाहणारे हे पाणी आपल्या शिवारात अडविले तर पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही तसेच जमिनीतील पाण्याच्या पातळीतसुध्दा वाढ होईल. वनराई बंधारा बांधून हे पाणी शिवारातच अडविणे सहज शक्य आहे. त्यामुळे आपल्या गावाचे जलसमृध्दीचे स्वप्न साकारण्यासाठी वनराई बंधा-याच्या बांधकामाकरीता श्रमदान करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात वनराई बंधाराबाबत आयोजित विविध सामाजिक संघटनाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते.
वनराई बंधारा बांधण्यासाठी वेळेचे बंधन असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, पुढील पंधरा दिवसात जिल्ह्यात जवळपास पाच हजार वनराई बंधारा बांधण्याचे नियोजन आहे. गावात वनराई बंधारा बांधण्यासाठी सध्याची वेळ उपयुक्त आहे. पुढील महिन्यापासून नदी-नाल्याचे वाहणारे पाणी कमी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठराविक वेळेत हे बंधारे बांधून झाले तर गावाच्या पाणी पातळीत नक्कीच वाढ होईल. प्रशासनाने नाला तेथे बंधारा हे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी अधिकारी व गावपातळीवरील शासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. विविध सामाजिक संघटनांनी यासाठी पुढाकार घेऊन जलसंवर्धानाच्या चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलतांना निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे म्हणाले, नदी-नाल्यांमध्ये सद्यस्थितीत पाणी वाहते आहे. वनराई बंधारा बांधण्यासाठी हा कालावधी आदर्श आहे. पाण्याचे संवर्धन करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत ही लोकचळवळ बनविण्याची जबाबदारी आपली आहे. सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्यात जलसंवर्धनाचे मोठे काम नक्कीच होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.  
बैठकीला पाणी फाऊंडेशन, रिलायन्स फाऊंडेशन, चेंबर्स ऑफ कॉमर्स, स्वामी समर्थ सेवा समिती, जिजाऊ बी.एङ महाविद्यालय, महात्मा ज्योतिबा समाजकार्य विद्यालय, न्यू चैतन्य बहुउद्देशीय संस्था, निसार फाऊंडेशन, फाऊंडेशन ऑफ इकॉलॉजी आदी संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

वनराई बंधा-यासाठी चिमुकल्यांचा सहभाग
बालक दिनाचे औचित्य साधून यवतमाळ तालुक्यातील मनपूर येथे जि.प.शाळेच्या चिमुकल्यांनी वनराई बंधारा बांधण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यासोबत श्रमदान केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, उपविभागीय अधीकारी अनिरूध्द बक्षी, तहसिलदार कुणाल झाल्टे, नायब तहसिलदार श्री. वेटे,  गटविकास अधिकारी श्री. घोंगडे यांच्यासह तालुका कृषी अधीकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक , ग्रामसेवक, जि.प शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, गावकरी, बचतगटाचे सदस्य आदींनी श्रमदान करून बंधारा बांधण्यासाठी योगदान दिले.

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी