रोजगार हमी योजना व शासकिय इमारतीचे बांधकाम करणा-या मजुरांची नोंदणी करावी जिल्हाधिकारी अमोल येडगे

सर्व उद्योगातील कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी यवतमाळ, दि २५ एप्रील जिमाका :- महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत १०० दिवस काम करणारे मजुर तसेच जल जीवन मिशन आणि शासकीय इमारतीचे बांधकाम सुरू असणाऱ्या सर्व कार्यस्थळी काम करणाऱ्या बांधकाम मजुरांची नोंदणी ई- श्रम पोर्टलवर करण्यात यावी. यासाठी ग्रामपंचायत, नगरपरिषद व नगरपंचायतने १०० दिवस काम केलेल्या मजुरांना प्रमाणपत्र उपलब्ध करुन द्यावे. तसेच कंत्राटदाराने मजुरांची नोंदणी केल्याशिवाय त्यांचे देयके अदा करु नयेत, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कामगार अधिकारी व इतर अधिका-यांना दिल्यात. कामगार विभागाच्या सर्व योजनांचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला, यावेळी त्यांनी सदर सुचना दिल्यात. या बैठकिला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे, व इतर अधिकारी उपस्थित होते. इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या मंडळाने जुलै 2020 पासून बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व विविध कल्याणकारी योजनेचा लाभ वाटपासाठी ऑनलाइन पद्धत सुरू केली आहे. त्यासाठी मंडळाच्या www.mahabocw.in या संकेतस्थळावर कामगारांना नोंदणी करता येते. आतापर्यंत एकूण ८३ हजार २७३ कामगारांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी १७५६७ कामगारांचे नूतनीकरण झालेले असून १० हजार ७९८ कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात आलेला आहे. नोंदणीच्या तुलनेत नूतनीकरण करणाऱ्या कामगारांची संख्या कमी दिसून येत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी कामगारांची मुदत संपत असताना त्यांना पोर्टलद्वारे नूतनीकरणाचा संदेश जाण्यासंदर्भात पोर्टलवर तशी सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना केली. तसेच नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर श्रमिकांचे अर्ज कशासाठी नाकारण्यात आले किंवा कोणत्या कारणांमुळे ते अपात्र ठरले याची सविस्तर माहिती मजुरांना देण्यात यावी असेही त्यांनी सांगितले. शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमामध्ये कामगार विभागाच्या अधिनस्त येणाऱ्या सर्व उद्योगातील कामगारांची नोंदणी करून घेण्यात यावी तसेच त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात यावा असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. असंघटित क्षेत्रामधील कामगारांची राष्ट्रिय स्तरावर माहिती संकलित करण्यासाठी केंद्र शासनाने ई-श्रम योजना पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर ३०० उद्योगात काम करणाऱ्या कामगारांचा डेटाबेस तयार करण्यात येत आहे. यामध्ये रोजमजुरी करणारे कामगार, रस्त्यावरील विक्रेते, दुकानात काम करणारे, बिडी कामगार, न्हावी, आशा कामगार, चामड्याच्या उद्योगातील कामगार, विणकर, सुतार, वीट भट्टी, दगडखान, सॉ मिल, घरगुती कामगार, सामान्य सेवा केंद्र, फळभाजी विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, इमारत व बांधकाम कामगार, रिक्षा ओढणारे, ऑटो चालक, सुतार, लोहार, लेबलिंग व पॅकिंग कामगार, शेतमजूर मच्छीमार, दूध उत्पादक शेतकरी, स्थलांतरित कामगार, पशुपालक व्यावसाईक कामगार मग्रारोहयोमध्ये काम करणारे कामगार इत्यादी कामगारांचा समावेश आहे. ई-श्रम पोर्टलवर आतापर्यंत जिल्ह्यातील जिल्ह्याला १३ लक्ष २८ हजार ६८० कामगारांची नोंदणी करण्याचा लक्षांक आहे. यात आतापर्यंत ५ लक्ष १६ हजार ७२६ कामगारांची नोंदणी झाली असल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे यांनी दिली .

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी