ताप अंगावर काढु नका -जिल्हा हिवताप अधिकारी यांचे आवाहन

जागतिक हिवताप दिन यवतमाळ, दि २५:- वातावरणातील बदलामुळे सद्यस्थितीत ताप येण्याचे प्रमाण वाढले आहे. जुन महिण्यापासून पारेषण (पावसाळा) काळ सुरु होतो. या कालावधीत हिवताप, डेंग्यू व इतर किटकजन्य आजारात वाढ होत असते. त्यामुळे कोणताही ताप हा हिवताप, डेंग्यु, किंवा मेंदुज्वर असु शकतो. नागरिकांनी ताप आल्यास अंगावर न काढता त्वरीत डॉक्टरांना दाखवावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी टी ए. शेख यांनी केले आहे. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागामार्फत एप्रील महिन्यात २५ एप्रिल हा जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच १ एप्रिल ते ३० एप्रिल संपूर्ण महिना हिवताप आजारा विषयी शहरी व ग्राम पातळीवर जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यात येते. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करुन दर दिवशी आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रमाव्दारे नागरीकांपर्यत माहीती पोहचविण्याचा प्रयत्न करणे हा 'जागतिक हिवताप दिन" महिना साजरा करण्यामागचा मुख्य उददेश आहे. या वर्षाचे घोषवाक्य ''शुन्य मलेरीया वितरीत करण्याची वेळ : गुंतवणुक करा, नवीन करा, अंमलबजावणी करा." असे आहे. हिवताप हा आपल्या राज्यातील सर्वात महत्वाचा आजार आहे. हिवताप आजाराची माहीती : हिवताप प्लाझमोडियम परोपजीवी जंतुमुळे होतो. महाराष्ट्रात प्लाझमोडियम व्हायव्हॅक्स व प्लाझमोडियम फॅल्सिपेरम या दोनच जाती प्रामुख्याने आढळतात. जंतु स्वतःचे जीवनक्रमासाठी मानवी रक्त व डास (विशिष्ट जातीचा ॲनाफिलीस डास) या दोन घटकांवर अवलंबून असतो. हिवताप ॲनाफिलीस डासाच्या मादीमार्फत पसरतो. डासाच्या लाळ ग्रंथीमध्ये असलेले सुक्ष्म जंतु रक्तशोषणासाठी चावा घेतांना रक्तामध्ये सोडले जातात. रक्तामध्ये सोडलेले जंतु प्रथम यकृतामध्ये एकत्र होऊन तेथे मोठया संख्येमध्ये वाढ होते. हिवतापाचा अधिशयन काळ १० ते १२ दिवसांचा आहे. हिवताप लक्षणे :- थंडी वाजुन ताप येणे. ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवस आड येऊ शकतो. घाम येऊन अंग गार पडते, बऱ्याच वेळा उलटयाही होतात. मेंदूचा हिवताप किंवा सेरेब्रल मलेरिया :-फॅल्सिपेरम प्रकारच्या हिवतापात वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यास मेंदूचा हिवताप होऊ शकतो. हा अत्यंत घातक असतो. वेळीच उपचार न झाल्यास गुंतागुंत वाढून रुग्ण दगावण्याची शक्यता असते. परिणाम :- तीव्र स्वरुपाचा ताप. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होवून थोडयाशा श्रमाने थकवा. झटके येणे.मेंदूज्वर रुग्ण बेशुध्द होतो. कावीळ (त्वचा व डोळे यांना पिवळा रंग येतो),फुफ्फुसावर सूज येते. रोगनिदान:- ताप आला असतांना जवळच्या केंद्रावर जावून उपचार घ्यावा. रक्त नमूना तपासणीनंतर निदान झाल्यानंतर क्लोरोक्वीन बरोबरच प्रायमाक्वॣीन गोळयांचा उपचार वयोमानानुसार देण्यात येतो. आवश्यक असेल तेंव्हा आरोग्य कर्मचाऱ्यास रक्त नमुना घेण्यास सहकार्य करावे, नियमित व संपूर्ण उपचार घेणे हे सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. पूर्ण उपचार घेतल्याशिवाय हिवताप जंतूचा पूर्णपणे नायनाट होत नाही. त्यामुळे वरचे वर ताप येतो. प्रतिबंध: डास आपणास चावणार नाहीत याकरिता मच्छरदाणीचा उपयोग करावा, घरासभोवताली पाणी साठवले खड्डे, डबकी बुजवून डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत, गवत काढणे, पाणी वाहते करणे, कालवे खणने इत्यादीमुळे डासोत्पत्तीस प्रतिकुल वातावरण निर्माण होवून डास निर्माती थांबविता येते, ज्या छोटया डबक्यामधील, तळ्यामधील पाणी वाहते करणे शक्य नाही, अशा डबक्यामध्ये, तळयामध्ये डासाच्या अळ्या खाणारे गप्पी जातीचे मासे सोडण्याचा उपक्रम राबवावा, इमारतीवरील टाक्या, वॉटर कुलर्स, कारंजी नियमितपणे वेळोवेळी स्वच्छ करावीत जेणेकरून डास उत्पत्तीस प्रतिबंध घातला जावू शकेल, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी, घरातील सांडपाणी खड्डयात सोडू नका पाणी वाहते करा. साठलेल्या पाण्यात रॉकेल सोडा.उघडे झोपणे टाळा. अंग झाकेल असे कपडे घाला, किटकनाशक भारीत मच्छरदाणीचा झोपतांना वापर करा, तापाच्या रुग्णांची माहिती त्वरीत आरोग्य कर्मचाऱ्यांस भेटी दरम्यान द्या व पुढील गुंतागुंत टाळावी असे आवाहन टी. ए. शेख यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी