मिशन इंद्रधनुष्य व पल्स पोलिओ अंतर्गत 100 टक्के लसीकरण करण्यावर भर द्या - जिल्हाधिकारी डॉ. देशमुख


यवतमाळ दि. 03 : जिल्ह्यात 8 ते 15 जानेवारी या कालावधीत मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेचा चवथा टप्पा राबविण्यात येत आहे. तर 28 जानेवारी आणि ११ मार्च 2018 रोजी पल्स पोलिओ मोहीम आहे. या दोन्ही उपक्रमाबाबत आरोग्य विभागाने सुक्ष्म नियोजन करून 100 टक्के लसीकरण करण्यावर भर द्यावा, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम व मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेसंदर्भात आयोजित जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी.जी.धोटे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, आयएमएचे सचिव डॉ. स्वप्नील मानकर, डॉ. तगडपल्लीवार, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. एस.एस. ढोले, न.प.चे डॉ. विजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
मिशन इंद्रधनुष्यबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, पहिल्या तीन टप्प्यात ज्या मुलांचे किंवा महिलांचे लसीकरण करायचे राहिले असेल, त्यांच्यापर्यंत पोहचून लसीकरण करा. गावस्तरावरील आरोग्य यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचा-यांनी लोकांमध्ये आरोग्यविषयक तसेच लसीकरणाबाबत जनजागृती आणि मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. लहान बालकांसाठी पल्स पोलिओ मोहीम ही अतिशय महत्वाची आहे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहता कामा नये. मागच्या काळात ज्या भागात लसीकरण कमी झाले असेल, त्या भागात गांभिर्याने लक्ष द्या. तसेच आदिवासीबहुल भागावरसुध्दा लक्ष केंद्रीत करा. हा केवळ आरोग्य विभागाचा उपक्रम नसून इतर विभागानेसुध्दा यात सहभागी व्हावे. यासंदर्भात आवश्यक त्या विभागांना तात्काळ लेखी सुचना द्याव्या, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.  
यवतमाळ जिल्ह्यात सन 1995 पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 2 हजार 352 ग्रामीण व 285 शहरी असे एकूण 2 हजार 637 बुथच्या माध्यमातून, 215 ग्रामीण व 88 शहरी असे एकूण 303 ट्रांझिट टिम आणि 117 ग्रामीण व 10 शहरी असे एकूण 127 मोबाईल टिमद्वारे 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लस पाजण्यात येणार आहे. ज्या बालकांना पल्स पोलिओ बुथवर काही कारणास्तव पोलिओ लस पाजण्यात आली नाही, अशा बालकांचा शोध घेऊन घरोघरी भेटीद्वारे पोलिओ लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गाव, वाडी, पोड, पाडा, तांडा, मळा, यात्रा, बाजार, बसथांबा, विटभट्या, उसतोड कामगार वसाहत, मेंढपाळ आदी ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांच्या पालकांनी आपले बालक या लसीपासून वंचित राहणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. बैठकीला रेड क्रॉसचे जलालुद्दिन गिलानी, लायन्स क्लबचे छोटुभाई खेतानी, रोटरी क्लबचे रमेश झेडा, डॉ. रजनी कांबळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
                                                            ०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी