नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा गांभीर्याने करा - महसूल राज्यमंत्री संजय राठोड

नेर येथील समाधान शिबिरात अधिकाऱ्यांना निर्देश
तत्काळ निर्णय घेऊन अनेक प्रश्न मार्गी

यवतमाळ, दि. ६ –  नागरिक आपल्या तक्रारी, समस्या मोठ्या विश्वासाने शासन, प्रशासनाकडे घेऊन येतात. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन, प्रशासन कटिबध्द आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या समस्यांचा गांभीर्याने निपटारा करून नागरिकांचे समाधान केले पाहिजे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.
महाराजस्व अभियानांतर्गत नेर येथील तालुका क्रीडा संकुलात आयोजित दारव्हा उपविभागस्तरीय समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती मनिषा गोळे, उपसभापती समीर माहुरे, जिल्हा परिषद सदस्य भरत मसराम, पंचायत समिती सदस्य रमेश बुरांडे, भीमराव खोब्रागडे, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, विशेष कार्य अधिकारी शिवानंद मिश्रा उपस्थित होते.
यावेळी बोलताना महसूल राज्यमंत्री संजय राठोड म्हणाले, सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवून त्यांना समाधान देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. या विभागाशी सर्वसामान्य जनतेचा दररोज थेट संबंध येतो. प्रशासन गतिमान होऊन जनतेच्या तक्रारी निकाली निघाव्या तसेच त्यांचा वेळ, श्रम आणि पैशाची बचत व्हावी, यासाठी विभागांतर्गत समाधान शिबीर सुरू करण्यासाठी आपण स्वत: पुढाकार घेतला. विशेष म्हणजे समाधान शिबिरामुळे प्रशासनाची काम करण्याची आणि नागरिकांच्या प्रश्नांचा निपटारा होण्याची गती वाढल्याचे निदर्शनास आले आहे. महसूल विभागाने गेल्या तीन वर्षात कायद्यात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करून जनहिताचे निर्णय घेतले, असे ते म्हणाले.
समाधान शिबिरात दारव्हा येथील गटविकास अधिकाऱ्याने चुकीचे उत्तर देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित अधिका-याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच सदर प्रकरण ग्रामविकास विभागाच्या सचिवांकडे प्रस्तावित करण्याचे निर्देश राठोड यांनी दिले. सेवा हमी कायद्यानुसार, दिलेल्या मुदतीत अधिकारी, कर्मचा-यांनी प्रकरण निकाली काढणे आवश्यक आहे. यात टाळाटाळ करणा-या अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच वेळेवर प्राप्त झालेल्या व प्रलंबित तक्रारीही लवकरच निकाली काढाव्यात, असे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले.
या शिबिरात २३९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात नेर पंचायत समितीच्या ५५, तहसीलच्या ३४, बांधकाम विभागाच्या १९ व इतर विभागांच्या मिळून १६३ तक्रारींचा समावेश होता. दारव्हा पंचायत समितीच्या ३६, तहसीलच्या १९, महावितरणच्या ६  व इतर विभागांच्या मिळून एकूण ७६ तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारी ऐकून त्यावर राज्यमंत्री राठोड यांनी तत्काळ निर्णय दिला. यावेळी नागरिकांनी घरकुल, सातबारा, पांदण रस्ते, वीज जोडणी, अंत्योदय, सिंचन विहीर,  प्रकल्प कालवा, पाणीटंचाई, शेतकऱ्यांना जाहीर झालेली मदत अशा अनेक विषयांच्या तक्रारी मांडल्या. 
नेर तालुक्यातील चिकणी डोमगा येथे जिवंत विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने स्वप्नील कापशिकर याचा काही दिवसांपूर्वी मृत्यु झाला होता. या शिबिरात त्याची आई लिलाबाई कापशिकर यांना राज्यमंत्र्यांच्या हस्ते 3 लाख ७० हजार रुपयांच्या मदतनिधीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. तसेच पांढरी येथील सतीश तायडे यांना राष्ट्रीय कृषी विकास निधीतील मदतीचा धनादेश देण्यात आला. 

         राज्य परिवहन महामंडळाच्या नेर, दारव्हा आगारातील कर्मचाऱ्यांना राज्यमंत्र्यांच्या हस्ते नवीन गणवेष राज्यभर वितरित करण्यात आला.
  परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाचा चेहरा मोहरा बदलविण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याच धर्तीवर कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू केला. लवकरच नेर, दारव्हा येथील बसस्थानकाचेही रूप बदलेल असे राज्यमंत्री राठोड यांनी सांगितले.
शिबिराला नेर, दारव्हा या दोन्ही तालुक्यातील संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                             0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी